सातारा : साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा होती. अखेर आज मंगळवारी उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा सामना शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उदयनराजे म्हणाले, उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली, असं ते म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. याआधी वेगवेगळ्या पक्षांची बरीच सरकारं येऊन गेलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत. विकासकामं सुरु आहेत. मी या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करीन माझे मित्र पूर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली चांगली विकासकाम सुरु आहेत, असं उदयनराजे भोसले म्हणाले.