उमरगा राष्ट्रीय महामार्ग ६५ महामार्ग रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Highway Road Condition: उमरगा : शहरानजीक असलेल्या बाह्यवळण रस्तावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर असलेल्या बाह्यवळण रोडच्या रस्त्याखाली असलेल्या पुलाखाली पाणी थांबल्याने प्रवाशांना धोका पत्करून मार्ग काढावा लागत आहे. कोरेगाव, गुगळगाव, बागदरी, माडज नाईचाकूर आदी गावांना जाण्यासाठी करण्यात आलेल्या भुयारी मागांत गेली अनेक दिवसांपासून पाणी थांबले आहे. य परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना दररोज शेतीच्या कामासाठी जा-ये करण्यासाठी याच ठिकाणाहून जावे लागते. मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने अनेक अपघात झाले आहेत. पाण्यातून जाण्यासाठी अनेकजण दुचाकी चालवत पाण्यातून जाण्याच्या प्रयत्न करतात. मात्र पाण्यात असलेल्या खङ्गधाचा अंदाज येत नसल्याने अनेजण पडून जखमी झालले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.
पुलाची उंची कमी असल्याने जड़वाहन चालकांची अडचणः सोशल मीडियावर विभागाची थट्टा
उमरगा शहरालगत गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण बायपास रोड करण्यात आला. महामार्गावर धावणारी अवजड वाहने शहरातून जात असताना वाहतूककोंडी होऊ नये, नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये आणि शहरातील व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शहरापासून जवळच रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर असलेल्या कोरेगावकडे जाण्यासाठी अंडर ग्राऊंड पूल बनविण्यात आला. मात्र पुलाची उंची कमी असल्याने अनेक वाहनधारकांना आपली अवजड वाहने घेऊन जाणे अवघड झाले आहे. केवळ लहान गाड्यांची सुरक्षित ये-जा होऊ शकते. मात्र मालवाहू गाड्या या पुलाखालून जाऊ शकत नाहीत. उसाने भरलेला ट्रक जाऊ शकत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा उत्तम नमुना म्हणून सोशल मीडियावर याची थट्टा केली जात असतानाही महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना इकडे पाहण्यासाठी सवड मिळत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बायपास रोडवरील भुयारी मार्गात दोन फूट पाणी थांबले असून दररोज आठ-दहा दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. शिवाय पर्यायी मार्गाने जाणे जिकिरीचे झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या ठिकाणाहून भरधाव गाड्या धावत असतात. त्यामुळे हा भुयारी मार्ग असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. बाह्यवळण रस्त्यावर अनेक सुविधा नसल्याने अपघात वाढत असल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी हा रस्ता रोखून धरला होता. यावेळी आ. प्रवीण स्वामी यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आंदोलनात सहभागी होत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र ती धार आता बोथट झाली आहे. पुन्हा अपघातसत्र चालू झाल्याने याला कोणीही वाली नसल्याची चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिशादर्शक फलकांचा नाही पत्ता
तालुक्यातील अनेक गावातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गवर अनेक ठिकाणी वळण आहे. मात्र तिथे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. कॉर्नरजवळ पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या पटचा मारल्या नाहीत, वाहनचालकांना देण्यात येणारा अणि इशारा फलकाचे फ्लेक्स लावले नसल्याने अनेक अपघात होत आहेत.
दिवाळीत अपघातामध्ये तरुणांचा गेला बळी
ऐन दिवाळीच्या सणात दाळिंब गावाजवळ दोन कारचा अपघात होऊन यात चार तरुण जागीच ठार झाले. निष्पाप जीव गमवावे लागले, याला जबाबदार कोण? महामार्गावर दिशादर्शक फलक लावले नसल्याने वळण रस्त्याचा अंदाज वाहनचालकाला आला नसल्याने हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. प्राधिकरणाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करण्याचा बडगा उगारतात. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या ही अवस्था कायमच आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.






