स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
BMC Elections 2025: मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी 2026 पर्यंत निवडणूकांचे सर्व कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र राजकारणाच्या गप्पा रंगल्या आहेत. मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीचे सर्वच दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला समोर आला आहे.
महायुतीमधील अनेक नेत्यांमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. पुण्यामध्ये तर महायुतीचे नेते एकमेकांची पोलखोल करत आहेत. मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित लढवल्या जातील असा दावा महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे, परंतु दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून मात्र स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती होणार की तीनही पक्ष स्वबळावर लढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आता महायुतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले आहेत. अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून देण्यात येत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. मुंबई पालिकेचा गड राखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती खासदार राऊत देत आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आणि मराठी मतं मिळवण्यासाठी मनसे-शिवसेना युतीची शक्यता एकीकडे वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर दुसरीकडे कॉंग्रेसला मनसे नेते राज ठाकरेंसोबतची युती पेटेनाशी झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस लढणार नाही, मी काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्टी डंके की चोट पर सांगितली होती. मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्ट सांगितली होती. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांच्या नाही. गेली वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे आहेत, आपण कधी ना कधी निवडणूक लढवावी, अशी त्यांचीही इच्छा असते. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढुयात, असे काँग्रेसच्या बैठकीत ठरल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.