फोटो सौजन्य: iStock
सावन वैश्य | नवी मुंबई : दिवाळी सणाचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय. गल्ली–बोळ, बाजारपेठा आणि सोसायट्यांमध्ये विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या आनंदाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काही ठिकाणी परवानगीशिवाय फटाके स्टॉल उभारले जात आहेत. त्यामुळे आग किंवा स्फोटासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. या काळात कपडे, मिठाई आणि फटाके खरेदी करण्याची परंपरा आहे. फटाक्यांच्या विक्रीसाठी पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असते. परंतु नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९, कोपरखैरणे, नेरुळ, सीबीडी बेलापूर, खारघर आणि ऐरोली परिसरात अनधिकृत फटाके स्टॉल उभारले गेले आहेत. हे स्टॉल गर्दीच्या ठिकाणी, नागरिकांच्या रहदारीच्या भागातच लागले असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अशा अनधिकृत स्टॉलवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की “अशा ठिकाणी आग लागली किंवा स्फोट झाला, तर जबाबदार कोण?”
तज्ञांच्या मते, जर फटाके विक्री लायसनशिवाय केली जात असेल, तर तो व्यवसाय पूर्णतः बेकायदेशीर मानला जातो. दुर्घटना घडल्यास पहिली जबाबदारी स्टॉलधारकाची असते, त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाची चौकशीची जबाबदारी येते.
अग्निशमन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “फटाक्यांचा साठा किंवा विक्री करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमभंग केल्यास दंड किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो.” त्याचप्रमाणे पोलीस आणि महापालिका प्रशासनालाही असे अनधिकृत स्टॉल शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, “फटाके फक्त परवानाधारक स्टॉलमधूनच खरेदी करा.”
तसेच छोटे व्यापारी, जे उपजीविकेसाठी फटाक्यांचा व्यवसाय करतात, त्यांनी अग्निशमन दलाचे परवाना, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाची परवानगी घेऊनच विक्री करावी, असा सल्ला दिला आहे.