प्रो कबड्डीत युपी योद्धाजची यु मुम्बावर मात; चुरशीच्या सामन्यात २९-२७ असा विजय
पुणे : भवानी राजपूत, गगन गौडा आणि भरतच्या यशस्वी चढायांच्या जोरावर युपी योद्धाजने रविवारी प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यु मुम्बावर चुरशीच्या सामन्यात २९-२७ असा विजय मिळविला. या विजयाने युपी योद्धाजने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चढाईपटूंना आलेले अपयश आणि युपी योद्धाजच्या गगन गौडा, भरत, भवानी राजपूत या उंचपुऱ्या चढाईपटूंना रोखण्यात आलेले अपयशच यु मुम्बाच्या पराभवास कारणीभूत ठरले. मनजीत, अजित चौहान यांनी अनुक्रमे ४ आणि ५ गुणांचीच कमाई केली. युपीकडून भवानी राजपूतकडून ७ आणि गगन गौडाने ५ गुणांची कमाई केली. हितेश आणि सुमितचा बचावही युपीसाठी महत्वाचा ठरला.
भवानी राजपूत, गगन गौडाच्या यशस्वी चढाया
पूर्वार्धातील सामन्यात युपी योद्धाज संघाने बचावपटूंच्या जोरदार प्रयत्नांच्या जोरावर आपली बाजू सुरक्षित राखली होती. तुलनेत यु मुम्बा संघाला चढाईपटूंनी हात दिला. मात्र, युपीच्या भवानी राजपूत आणि भरत, गगन गौडा या उंचापुऱ्या चढाईपटूंना रोखणे मुंबईच्या बचावपटूंना कठिण गेले. परिणामी अत्यंत सावध झालेल्या पूर्वार्धातील खेळात मध्यंतराला युपी योद्धाज संघाला १३-१२ अशी एका गुणाची आघाडी घेता आली होती.
सलग सहा सामन्यात अपराजित, दोन बरोबरी
उत्तरार्धात युपी योद्धाज संघाने सामन्याला वेग घेतला. भवानी राजपूतच्या वेगवान चढायांनी चोख काम बजावत उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटांत यु मुम्बा संघावर लोण चढवत आपली आघाडी २४-१६ अशी भक्कम केली. उत्तरार्धात यु मुम्बाच्या चढाईपटूंनाही यश आले नाही. सामन्यातील या तिसऱ्या सत्रात युपीने ११ गुणांची कमाई केली, तर मुम्बा संघाला चारच गुण मिळवता आले. मात्र, राखीव खेळाडू सौरभ राऊत आणि रोहित राघव यांच्या खोलवर चढायांनी यु मुम्बाने बाजी पलटवली आणि चार मिनिटे बाकी असताना युपीवर लोण चढवत २५-२६ अशी पिछाडी कमी केली. सामन्याला दीड मिनिट बाकी असताना सौरभच्या यशस्वी चढाईने सामन्यातील रंगत वाढली होती. युपीची आघाडी एका गुणाचीच होती. अखेरच्या चढाईत मात्र युपीने रोहित राघवची पकड करुन २७-२९ अशी आघाडी वाढवली आणि याच आघाडीवर युपीने विजयाला गवसणी घातली.