पुणे : प्रो कबड्डी लीगमध्ये उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवीत यूपी योद्धाज संघाने हरियाणा स्टीलर्स संघावर ३१-२४ असा सनसनाटी विजय नोंदविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. मध्यंतराला युपी योद्धाज संघाकडे दोन गुणांची आघाडी होती.
हरियाणा स्टीलर्स अगोदरच प्लेऑफमध्ये
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी गटात गुण तालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या हरियाणा संघाने यापूर्वी झालेल्या २० लढतीतील पैकी १५ लढती जिंकून प्ले ऑफ मध्ये या अगोदरच स्थान घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने उर्वरित साखळी सामने म्हणजे प्ले ऑफ पूर्वीची रंगीत तालीमच आहेत. प्ले ऑफ मधील सामन्यांसाठी आतापासूनच रणनीती आखण्याच्या दृष्टीने हे साखळी सामने त्यांना महत्त्वाचे आहेत. त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला यूपी योद्धाज संघास प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या संधी आहेत. त्यामुळेच आजची लढत त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. आतापर्यंत त्यांनी १९ सामन्यांपैकी दहा सामने जिंकले आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये आघाडी घेण्यासाठी सतत संघर्ष दिसून येत होता. दहाव्या मिनिटाला हरियाणा संघ ६-५ असा आघाडीवर होता. मात्र यूपीच्या खेळाडूंनी जिद्द सोडली नाही. ७-१० अशा पिछाडीवरून त्यांनी १८ व्या मिनिटाला लोण चढविला व १३-११ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांच्याकडे १५-१३ अशी नाममात्र आघाडी होती. उत्तरार्धातही यूपीच्या खेळाडूंनी जोरदार चढाया आणि भक्कम पकडी याच्या जोरावर आणखी एक लोण नोंदविण्यात यश मिळविले. त्यामुळे त्यांच्याकडे २३-१४ अशी मोठी आघाडी आली. ३० व्या मिनिटाला त्यांच्याकडे २४-१६ असे आधिक्य होते. शेवटचे पाच मिनिटे बाकी असताना त्यांनी २८-१९ अशी आघाडी घेतली होती.
प्ले ऑफ मधील स्थान यापूर्वी निश्चित झाल्यामुळे हरियाणा संघ आज फारसा गांभीर्याने खेळला नाही. अर्थात यूपी योद्धाज संघांच्या खेळाडूंनी आज प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवायचे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत खेळ केला. युपी योद्धा कडून सुमित याने उत्कृष्ट पकडी केल्या तर भवानी रजपूत व भरत या दोघांनी पल्लेदार चढाया केल्या. हरियाणा संघाकडून शिवम पठारे व विशाल ताटे यांनी जोरदार चढाया केल्या.