अहमदनगर : काँग्रेस पक्षाच्या महासचिवपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसने उबाठा शिवसेनेला जागा दिल्याने आणि महाविकास आघाडीने उमेदवारीबाबत त्यांचा विचार न केल्याने त्या नाराज होत्या. याच नाराजीतून त्यांनी बुधवारी सायंकाळी सर्व पदांचे राजीनामे देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अन् मध्यरात्री ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीत प्रवेश केला.
उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मध्यरात्री वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शिर्डीमधून निवडणूक लढविल्यास महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते. त्या वंचितच्या उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार असल्याचे निश्चित झाल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. या निमित्ताने बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण होणार आहे.