वडगाव मावळ नगरपंचायत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Election 2025 : वडगाव मावळ: सतिश गाडे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांचे (Local Body Election) बिगुल वाजले असून आरक्षण जाहीर झाले आहेत. यामध्ये महिलांनचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. वडगाव मावळ (Wadgaon Maval) नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित आल्याने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. आता नगरपंचायतीवर ‘कारभारीन’ कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नगरपंचायतींच्या आरक्षण यादीनुसार वडगाव मावळ येथे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे विविध पक्षांतील महिला नेत्यांना नेतृत्वाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक प्रभावी महिला कार्यकर्त्या आणि संभाव्य उमेदवार तयारीस लागल्या आहेत. काही अनुभवी महिला नगरसेविका तसेच नव्या चेहऱ्यांनीही इच्छुकता दर्शवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक नागरिकांच्या मते, “वडगाव मावळ नगरपंचायतीच्या नेतृत्वात महिलांचा सहभाग वाढणे ही सकारात्मक गोष्ट आहे. महिला नगराध्यक्षा आल्यास नगरातील विकासकामांना नवा वेग मिळेल,” असे मत व्यक्त केले जात आहे. आता येत्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांतर्फे उमेदवार निवडीसंदर्भातील हालचालींना वेग येणार असून, ‘वडगाव मावळची कारभारीन कोण?’ हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नगरपंचायतीचे १७ प्रभागांचे आरक्षण उद्या जाहीर होणार; इच्छुकांमध्ये चर्चेची जोरदार लगबग
वडगाव मावळ नगरपंचायतीच्या 17 प्रभागांचे आरक्षण उद्या जाहीर होणार असून, या घोषणेपूर्वीच स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच जोरदार चर्चा रंगली आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होणार आणि कोणाचा राजकीय पत्ता लागणार, याबाबत उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे. राज्य शासनाकडून नगरपंचायतींच्या प्रभाग आरक्षण प्रक्रियेला अंतिम टप्पा आला असून, वडगाव मावळसह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार यांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मागील निवडणुकीत झालेल्या आरक्षण फेरबदलानंतर अनेक प्रभागांमध्ये नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी लगबग सुरू असून, आरक्षण आपल्या प्रभागात कोणत्या वर्गासाठी लागू होते यावरच अनेकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. काही ठिकाणी महिला, तर काही ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारांची संभाव्य नावे चर्चेत आहेत. नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ ते १७ पर्यंतच्या आरक्षण नकाशावर सध्या सर्वांचेच डोळे खिळले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच पक्षीय हालचालींना वेग मिळणार असून, उमेदवार निवडीसाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांमध्येही उत्सुकता असून, “आरक्षणामुळे काही जुन्या चेहऱ्यांना धक्का बसेल, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल,” असे मत व्यक्त केले जात आहे.