सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड हे सोमवारी दुपारी पाहुणे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले. त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे आत आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मडीखांबे यांना पोलिसांना ताब्यात घेण्याची सूचना केली. यानंतर गायकवाड माध्यमांशी न बोलता निघून गेले.
गायकवाड यांनी माघार घेतल्याने स्थानिक नेत्यांचे चेहरे पडले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. एमआयम पक्षाने यापूर्वीचं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅड. सचिन देशमुख यांची माघार
माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. माध्यमांशी बोलताना सचिन देशमुख म्हणाले, कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच माघार घेतली.
प्रमोद गायकवाड यांचा अर्ज मागे
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपला अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत येऊन गायकवाड यांनी आपली माघार घेतली.