सौजन्य - नवराष्ट्र टीम
ऑक्टोबरमध्येच गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेबाबत कोणतीही माहिती, हरकतीची नोटीस अथवा चर्चा न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. २२६ कुटुंबांच्या सुमारे ५०० गट नंबरच्या जमिनी नव्या गावात टाकल्याने या वस्त्यांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला. “आपल्याच जमिनी कोणालाही कळवळ्याविना दुसऱ्या महसूली गावात?” असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, भोसलेनगरच्या प्रतिनिधींनी परिस्थिती स्पष्ट करत १९८६ पासून ‘लुगडेवाडी’ नाव प्रचलित असले तरी दप्तरी नाव ‘भोसलेनगर’ असल्यामुळे अधिकृत गावनाम नोंदणीसाठी महसूली गावाचा दर्जा आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचे त्यांनी नमूद केले; मात्र या प्रक्रियेत वस्ती भागातील नागरिकांना विश्वासात न घेतल्याने गैरसमज वाढल्याचे मान्य केले.
तणावपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेनंतर ग्रामसभेने ‘नवीन महसूली गाव’ आदेश रद्द करण्याचा ठराव मोठ्या बहुमताने मंजूर केला. तसेच भविष्यात ‘भोसलेनगर’ या नावासाठी नव्या प्रस्तावाची शिस्तबद्ध आणि पारदर्शी प्रक्रिया राबवावी, अशी सूचना ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.
या बैठकीस ग्राममहसूल अधिकारी प्रकाश पांढरे, ग्रामसेवक विनय थोरवत, सरपंच सारिका जमदाडे, उपसरपंच सचिन जमदाडे, सतीश पवार, शशिकांत जमदाडे, तानाजी लांडगे, दिलीप जमदाडे, अरुण पवार, रामचंद्र लांडगे, प्रदीप पवार, बाबासाहेब जमदाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.






