पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी (PCMC Police) गॅस सिलेंडरचा काळाबाजार (gas cylinders Black market) करणाऱ्यांना अटक केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणाऱ्या एकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजता नखाते वस्ती येथे करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार विक्रांत चिंतामण चव्हाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हेमाराम थानारामजी चौधरी (वय-38 रा. मथुरा कॉलनी समोर, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) आयपीसी 285 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 व 7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 , कलम 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा सुगावा वाकड पोलिसांना लागला. त्यानुसार पोलिसांनी नखाते वस्ती येथील श्रीराम सायकल मार्ट येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना दिसून आले.
आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आले. त्याच्याकडून 18 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.