मराठवाडा ग्रीड प्रोजेक्ट (फोटो- istockphoto)
मुंबई: मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मराठवाड्यातील ११ मोठी धरणे पाईपलाईनद्वारे जोडून शहरे आणि गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे, तसेच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागतिक स्तरावरील बँकांचा सहभाग आहे असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासन वर्ल्ड बँक, आशियायी विकास बँक यासारख्या बँकांमार्फत कर्ज स्वरुपात निधी उभारणी करुन ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाची उभारणी करत या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होईल, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरच्या मदतीने तात्पुरती उपाययोजना करण्यात आली असून, लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य रवीशेठ पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
Gulabrao Patil: ‘या’ भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार; गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पेण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत २३ गावे-वाड्यांमध्ये, तर एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत १६३ गावे-वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे.या उपयोजनांसाठी ९४.८६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रशासनाला निर्देश
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.