पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (फोटो - सोशल मिडिया)
मुंबई: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरच्या मदतीने तात्पुरती उपाययोजना करण्यात आली असून, लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य रवीशेठ पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पेण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत २३ गावे-वाड्यांमध्ये, तर एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत १६३ गावे-वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे.या उपयोजनांसाठी ९४.८६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत खारेपाट भागातील नागरिकांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत शहापाडा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत ३८ गावे आणि १०८ वाड्यांसाठी २५.८८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, १२९ किलोमीटर पाईपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. काही गावांसाठी अतिरिक्त पाईपलाइन आवश्यक असल्याने ३३.१२ कोटी रुपयांची सुधारित योजना मंजूर करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ३८ गावे आणि १०८ वाड्यांसाठी ५ हजार २०० वैयक्तिक नळजोडण्या देण्यासाठी १९९.७८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या नळ कनेक्शनचे काम सुरू असून या भागातील नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रशासनाला निर्देश
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही पाटील यांनी सांगितले.