कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये 8 तास पाणीपुरवठा बंद (फोटो सौजन्य-X)
कल्याण : गेल्या काही काळात जोरदार पाऊस होऊन देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कल्याण आणि डोंबिवलीमधील काही भागांमध्ये दूरुस्तीच्या कारणोत्सव पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
दरम्यान महावितरणकडून २२ KV NRC-२ फिडर सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम तसेच पावसाळ्यापूर्वी केडीएमसीच्या सर्वच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील या भागांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी म्हणजेच 27 मे 2025 रोजी 8 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
महावितरणच्या या सबस्टेशनवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतीवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी 27 मे 2025 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८ तास कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या क्षेत्रातील कल्याण ग्रामिण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व – पश्चिम विभाग आणि डोंबिवली पूर्व तसेच डोंबिवली पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा 27 मे 2025 रोजीच्या मंगळवारी बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले आहे. तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.
गेल्या काही काळात जोरदार पाऊस होऊन देखील मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 28 मे रोजी शहरातील काही भागांत आणि पूर्व उपनगरातील रहिवाशांना 15 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागेल. बीएमसीच्या पंजरापूर पंपिंग स्टेशनवर नियमित दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 13 तास पाणी बंद राहणार आहे, अशी माहिती बीएमसी पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलीये. तसेच बीएमसीच्या पंजरापूर पंपिंग स्टेशनवर बुधवारी देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील पूर्व उपनगरांत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. हे शटडाऊन सकाळी 9.15 ते रात्री 10.45 या वेळेत 13 तासांसाठी असेल. पंजारपूर पंपिंग स्टेशनवरून केवळ मुंबईलाच नव्हे तर ठाणे आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत भागात देखील पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी बीएमसी पहिल्या टप्प्यात एक नवीन प्रेशर कंट्रोल टँक (अँटी-सर्ज व्हेसल) बसवणार आहे.