मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने (Weather Forecast) केले आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे. तसेच आवश्यक असेल तर पाण्याची बाटली घेऊन घराबाहेर पडावे, असे पुणे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.
कोकण पट्ट्यात वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट का येण्याची शक्यता आहे?
याचे कारण म्हणजे जमिनीच्या पातळीजवळचे वारे जे उत्तरेकडून येत आहेत जे आधीच उष्ण आहेत pic.twitter.com/BAmStzDUmr— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 20, 2023
कोकणासाठी यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 अंशांच्या आसपास जाणार आहे. कोकणामध्ये विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासाठी आज यलो अलर्टचा (Yellow Alert In Kokan) इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
#Heatwave alerts by IMD Mumbai @RMC_Mumbai for #Maharashtra, #Konkan area for 48 hrs.
Though Yellow Alerts, but still TC pl.
Avoid outside between 11-2pm if possible. Water bottle necessary.
????????????☂ pic.twitter.com/AQUpIZLSYz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 20, 2023
रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तापमान 37.9 अंश असे नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पाराही 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान आणि कमाल तापमान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके, अशी स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासोबत गोव्यामध्येही कमाल तापमानाचा पारा 37 ते 39 अंशांदरम्यान आहे. तीन दिवसांनंतर कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट जाणवू शकेल. दरम्यान, हवामान विभागाने कच्छमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सर्वसाधारणपणे उत्तर महाराष्ट्रात याचा परिणाम दिसून येतो. मात्र, हवामान विभागाने राज्यातील इतर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला नाही.