manoj jarnage on beed
बीड : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाल्याने संपूर्ण गावात आणि इतर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ही दगडफेक कोणी केली, का केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत घटनेवरून मनोज जरांगे या यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मंत्री छगन भुजबळांना दंगली घडवून आणायचा नाद आहे. राज्यात शांतता राहू द्यायची नाही, हा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे. हा विषय इतका सहज समजू नका, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळांनी त्यांना आपापल्या गाड्या फोडा, दगडं हाणा, काही चितावणी द्या, असं सांगितले असेल. राज्यात दंगली घडवून आणणे हेच भुजबळांचं स्वप्न आहे. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे. हा विषय खूप गंभीर आहे, असेही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केले.
छगन भुजबळांनीच वडीगोद्रीत आंदोलनकर्त्यांना उपोषण करायला सांगितले होते. पण आम्ही ओबीसी बांधवांना अजिबात दोष देणार नाही. कारण भुजबळांनीच त्यांना नादी लावले होते. त्यांनाच तिथे दंगल घडवून आणायची होती, वाद घडवून आणायचा होता, अशी टीकाही जरांगेंनी यावेळी केली. दोन समाजात संघर्ष घडवून आणायचा, पेटवा पिटवी करायची. गोरगरीब लोक अडचणीत आले पाहिजेत. ओबीसी आणि मराठा समाजातही जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा धंदा आहे, असा घणाघात मनोज जरांगेंनी यावेळी बोलताना केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात गुरूवारी (२७ जून) सायंकाळी दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. ओबीसी समाजाने प्रा.लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याने मातोरी परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
हाकेंच्या स्वागतासाठी आलेल्या रॅलीतील दोन गटात काही कारणास्तव वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक सुरू झाली. जवळपास अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिस्थिती निंयत्रणाखाली आणली. पण मध्यरात्री पुन्हा एकदा शिंगोरी फाटा, बोरगाव फाटा याठिकाणी जमावाने काही वाहनांची तोडफोड केली.
या दगडफेकीत अनेक दुचाकींसह वाहनांची तोडफोड झाल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण ही दगडफेक नेमकी कोणी केली, का केली, आणि कोणत्या कारणावरून वाद झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.