देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी वर्णी का लागली? ही आहेत ५ प्रमुख कारणं
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि गेल्या ११ दिवसातील नाट्यमय घडामोडींनतर अखेर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थिती भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिलं. त्याला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.
देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. इतक्या मोठ्या राजकीय घडामोडी आणि मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि महायुतीतून अनेक नावे चर्चेत असताना फडणवीस यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवडण का करण्यात आली? असा प्रश्न काहींना पडला असेल, जाणून घेऊया त्यामागची नक्की कारणं कोणती आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १० वर्षात वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणं इतकं सोप नव्हतं. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र, एकनाथ शिंदे आणि पवार यांना सोबत घेऊन सत्तेचं समीकरणं साधायचं होतं.
महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. 2019 च्या निवडणूक निकालांनंतर शिवसेनेशी युती तुटल्यानंतर फडणवीस राज्याच्या राजकारणात राजकीय मुत्सद्देगिरीचं काम केलं आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत आले. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा त्याग करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फटू पडली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सरकारमध्ये सामिल करून घेतलं. शरद पवारांना हा मोठा राजकीय धक्का होता.
फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली राजकीय केमिस्ट्री आहे. तसेच शिंदे यांच्याशीही राजकीय समन्वय साधून फडणवीस चांगलं काम करू शकतात. अडीच वर्ष फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे शिंदेंना ते जवळून ओळखतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा राजकीय अनुभवाबद्दल फडणवीस परिचित आहेत. म्हणूनच भाजपने सत्तेची सर्व सूत्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहेत.
देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले मानले जातात. 2014 मध्ये भाजपने महाराष्ट्रात विजय मिळवला त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी नितीन गडकरी, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं. याचे कारण म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला शिवसेनेपासून वेगळे राहून एकट्याने निवडणुकीला सामोरं जायचं होतं. फडणवीस नागपूरमधून येतात, त्यामुळे संघाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना संघाशी संतुलन साधून काम केलं आहे. याशिवाय मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे पोस्टर बॉय असलेले फडणवीस त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि लोकप्रिय आहेत.