एसटी प्रवासातूनच महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरीला; चालक-वाहकाने मदतीऐवजी महिलेला भररस्त्यातच... (संग्रहित फोटो)
आळेफाटा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना आळेफाटा-लोणी मावळा मार्गावर घडली आहे. पारनेर एसटी आगाराच्या पुणे-पारनेर या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. मात्र, चोरीनंतर मदत करण्याऐवजी संबंधित महिलेलाच बसमधून भररस्त्यात उतरवून दिल्याचा आरोप चालक व वाहकावर करण्यात आला आहे.
कोमल स्वप्नील आहेर या आळेफाट्यावरून लोणी मावळ्याकडे एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या मागे बसलेल्या एका संशयित महिलेने शिताफीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोडल्याचे सांगितले जात आहे. गळ्यातील मणी खाली पडल्याचे कळल्यानंतर कोमल आहेर यांनी हालचाल सुरु केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये असल्याचे समजते.
घटनेनंतर कोमल आहेर यांनी बसमध्ये आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. अशा परिस्थितीत नियमानुसार बस जवळच्या पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदविण्यास मदत करणे अपेक्षित असते. मात्र, चालक व वाहकाने कोणतीही मदत न करता उलट महिलेलाच बेल्हे परिसरात भररस्त्यात उतरविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर वाहकाने त्यांच्या हातातील तिकीटही काढून घेतल्याचे पीडित महिलेने सांगितले.
“तिकीट काढूनही आम्हाला मध्येच का उतरवले? चोरी झाली म्हणून मदत मिळण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळाली,” असा संतप्त सवाल कोमल आहेर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित चालक व वाहकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून, दागिने चोरी करणाऱ्या संशयित महिलेचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणीही प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
या घटनेमुळे एसटी प्रवासातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन महामंडळाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.






