संग्रहित फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्याची परवानगी मागण्यासाठी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी अॅड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद अॅड. मिथुन चव्हाण यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना नियमानुसार निवडणूक लढविण्यास परवानगी दिली. निवडणुकीसाठी नामांकनपत्र सादर करण्यासह त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोपींनी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताच्या मागणीसाठी अर्ज करावा, त्यावर परिस्थिती विचारात घेऊन आदेश दिले जातील, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
वनराज आंदेकर खून
१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमा गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपींचा समावेश होता. वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती आहे. ही बाब शहर पोलिस दल तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहीत होती. त्यानुसार, वनराज आंदेकरच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना आंदेकर टोळीने भारती विद्यापीठ परिसरात खुनाचा कट रचला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो कट उधळून लावण्यात आला. परंतु नाना पेठेत झालेला कट पोलिसांना रोखता आला नाही आणि त्यात १८ वर्षीय आयुष कोमकर बळी ठरला. गेल्या काही दिवसाखाली आयुषचा खून केला आहे. या खूनानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Ans:






