लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणारच (Photo Credit- Social Media)
परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेतून महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे गरजू महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल. मात्र, विरोधक याबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
उपसभापती नीलम गोऱ्हे या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्या होत्या. शनिवारी त्यांनी परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. याप्रसंगी परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
डॉ. गोऱ्हे यांनी सरकारी पैशांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. प्रामाणिक लोकांनी यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे स्पष्ट केले. महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध शिबिरे घेत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.
सभासद मोहीम राबवण्याच्या सूचना
पक्षातील पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसंपर्क वाढविण्यासाठी दोन दोन हजार लोकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. जुन-जुलै महिन्यामध्ये विविध शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले सोप्या पध्दतीने मिळावे यासाठी समाधान शिबीरे घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.






