हिंगोलीतील स्मार्ट प्रकल्पाला भेट जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : हिंगोली : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना जागतिक पातळीवरील मान्यता मिळत असून, याच अनुषंगाने जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पाच्या विविध घटकांना भेट देऊन शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला.
यावेळी श्री फाळेश्वर महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., फाळेगाव ता. जि. हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रास त्यांनी भेट दिली. या केंद्रामार्फत मंगळवारपर्यंत सुमारे ८ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून अंदाजे ३ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हे देखील वाचा : निवडणुकीनंतरही वसमत शहर घाणीच्या विळख्यात; स्वच्छता व्यवस्था कोलमडली, नागरिक त्रस्त
कंपनीमार्फत आतापर्यंत सुमारे ५० हजार मेट्रिक टन हळदीची निर्यात
या प्रसंगी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट हिंगोली कार्यालयातील नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ जी. एच. कच्छवे, अर्थशास्त्र तज्ज्ञ जितेश नालट, कंपनीचे संचालक मारोती वैद्य तसेच इतर संचालक उपस्थित होते. जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी उपस्थित संचालकांना प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील संधी, बाजारपेठ विस्तार आणि मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर त्यांनी दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., कळमनुरी येथे भेट देऊ नहळद काढणीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंतच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे संचालक गंगाधर रिंगारे यांनी कंपनीमार्फत आतापर्यंत सुमारे ५० हजार मेट्रिक टन हळदीची निर्यात करण्यात आल्याची माहिती दिली.
हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
हिंगोली विधानसभेत पाणद रस्त्यांचा मार्ग मोकळा
विधानसभेतील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पानंद रस्त्यांच्या प्रश्नावर हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हिंगोली विधानसभेतील पानंद रस्त्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी एकूण १२६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून त्यांची वर्क ऑर्डरही आज रोजी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच या विधानसभेत एकूण २७८ प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणावर पानंद रस्त्यांचे खडीकरण तसेच पुलांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत.
या कामांमुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी कोणतीही अडचण भासणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेअंतर्गत आ. तानाजीराव मुटकुळे यांनी शेतकरी वर्गाचा दीर्घकालीन प्रश्न सोडविल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार भुजबळ, मुळे साहेब, बीडीओ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






