पवना-मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सतर्कतेचा इशारा(File Photo : Khadakwasla Dam)
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण १८.३५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ६२.९५ टक्के पाणी साठले आहे. त्यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये केवळ ५.६६ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा सुरुवातीपासूनच झालेल्या चांगल्या पावसामुळे साठ्यात तब्बल १२.६९ टीएमसी वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी, धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
हेदेखील वाचा : Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
गेल्या 24 तासांत खडकवासला धरणात ४ मिमी, पानशेतमध्ये २७ मिमी, वरसगावमध्ये २४ मिमी आणि टेमघरमध्ये ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे घाटमाथ्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे धरणक्षेत्रात जलसाठा वाढत असून, काही दिवसांपूर्वी सुरू केलेला पाण्याचा विसर्गही जलसंपदा विभागाने आता कमी केला आहे. सध्या खडकवासला धरण ६०.२६ टक्के, टेमघर ५२.४५ टक्के, वरसगाव ६७.४६ टक्के, तर पानशेत ६१.६६ टक्के भरले असून, एकूण साठा ६२.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, कळमोडी आणि नाझरे ही धरणे १०० टक्के भरली असून, चासकमान, वडज, विसापूर, पवना, गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड आणि येडगाव या धरणांमध्येही ७२ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे.
मुळशीच्या टाटा धरणात 72.89 टक्के पाणी
मुळशी येथील टाटा धरणामध्ये ७२.८९ टक्के, तर भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा आहे. पुरेशा जलसाठ्यामुळे पुणे शहरात पाणीकपात न करता नियमित पाणीपुरवठा शक्य होणार असून, येत्या काळात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वर्षभरासाठी पाण्याची चिंता दूर होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तब्बल 1300 टँकरने पाणीपुरवठा
मे आणि जून महिन्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत होत्या. धरणांत पाणी असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणे, हे महापालिकेच्या पाणी व्यवस्थापनातील अपयशाचे लक्षण असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता मुबलक पाणी साठा उपलब्ध झाल्याने पुणेकरांच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.