राजगुरूनगर : राजगुरूनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी मोठी व्यावसायिक बाजारपेठ आहे. येथे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, वीजवितरण कंपनी, भारतीय आयुर्विमा मंडळ, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आपल्या कुटुंबाचे गुजराण चालवणारे व्यावसायिक मंडळीही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील एक व्यावसायिक वर्ग म्हणजे झेरॉक्स दुकानदार! परंतु सद्यपरिस्थितीत हा वर्ग प्रचंड महागाईमुळे त्रस्त झालेला दिसत आहे. वाढती महागाई तसेच सतत झेरॉक्स पेपरमध्ये प्रचंड प्रमाणात होणारी वाढ, गगनाला भिडणारे विजेचे दर यामुळे हा वर्ग त्रस्त झाला असून तसेच व्यवसायीक स्पर्धेमुळे व्यावसायिक गाळा भाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली वाढ, या सर्व गोष्टीचा मेळ घालून उत्पन्न मिळविणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे.
पेपरचे भाव आणि दर महिन्याला येणारे भरमसाट लाईटबिले यामुळे या व्यवसायीकाची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे. काही मुख्य कार्यालयांच्या परिसरात तर भरमसाट जागेची भाडे वाढ झाल्यामुळे नुसतेच भाडे भरत राहण्याची वेळ या झेरॉक्स व्यवसायीकांवर आलेली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून राजगुरूनगर शहारातील व परिसरातील सर्व झेरॉक्स व्यवसायिक एकत्र येऊन त्यांनी संघटना तयार करण्याचे ठरविले असून, संघटनेच्या माध्यमातुन झेरॉक्सचे दर कसे असावेत हे सर्वांनुमते ठरविण्यात येणार असल्याचे सुधाकर जाधव व रवी गायकवाड यांनी सांगितले.
(दि.१) सप्टेंबर २०२२ पासुन राजगुरूनगर शहारामध्ये झेरॉक्सचे सर्वत्र एकच दर असतील असे या सभेमध्ये ठरविण्यात आलेले आहे. तसेच संघटनेची रितसर नोंदणी करून सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे. व अशाप्रकारचा ठराव सर्वानुमते या सभेमध्ये मंजुर करण्यात आला असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिना हा विशेष क्रांतीचा महिना म्हणून गणला जातो. तर आता झेरॉक्स व्यावसायिकांनी ही क्रांती घडवून आणण्यासाठी (दि.७) ऑगस्ट रोजी सिध्देश्वर मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या सभेला राजगुरूनगर शहारातील झेरॉक्स व्यवसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन पाचारणे, मोहनदास गावडे, प्रसाद वाळुंज, रवि गायकवाड, प्रविण साठे, महेश रासकर, सुधाकर जाधव, राजेंद्र काळे, आनंद भोगाडे, संदीप बढे, कांताराम टाकळकर, नवनाथ कोहिणकर, शिवाजी चौधरी, जगदीश बल्लाळ, दिगंबर ढोरे, प्रितम निकम, संदेश डेरे, पंकज दाते, अदिक वाडेकर, उत्तम गावडे, ऋषिकेश जोरी इत्यादी झेरॉक्स व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[read_also content=”महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी ट्रकखाली चिरडून ठार https://www.navarashtra.com/maharashtra/two-college-students-were-crushed-to-death-under-a-truck-nrdm-314804.html”]
मशीनला हात लावायला १००० रुपये
गतवर्षी पेपरची रिम १५० रुपयांना मिळत, सध्या त्या रिम साठी जवळपास ३०० रुपये मोजावे लागतात. मशिनच्या देखभालीसाठी पूर्वी ५०० रुपये मॅकॅनिक घेत असे आता मशीनला हात लावायला १००० रुपये द्यावे, लागतात. खराब झालेल्या पार्टची किंमत वेगळी मोजावी लागते. विजेचे बिल भरता भरता नाकीनऊ येतात.
दुकानाला भाडे १२ ते १५ हजार देऊन मशीन साठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे खूप अवघड होऊन बसले आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. चरितार्थासाठी हा व्यवसाय निवडला तर त्यातही मोठी नामुष्कीच पदरी पडत आहे. सर्व सामान्य ग्राहक कामाचे पैसे देतात, परंतु शासकीय-निमशासकीय कर्मचारी त्यांच्या कडील असणाऱ्या जादा कामामुळे पैसे कमी करण्याचा आग्रह धरून बसतात.
– महेश रासकर, झेरॉक्स व्यावसायिक