सौजन्य - नवराष्ट्र टीम
नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.”
त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.”
झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.”
या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.






