पाटस येथे कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे अक्षरश: लोट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाटस : पाटस येथील कचरा डेपोतील कचऱ्याला आग लावण्यात आल्याने संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या विषारी धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका नगर परिसरात जगदाळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ग्रामपंचायतीने उभारलेल्या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो. या डेपोतील कचऱ्याला अचानक आग लागली. ही आग कोणी लावली की नैसर्गिकरित्या लागली, याबाबत संभ्रम आहे. मात्र, आग विझवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कोणतीही उपाययोजना न केल्याने आग भडकली व प्रचंड धूर निर्माण झाला. या धुराचा लोट हवेत पसरला.
प्लास्टिक तसेच ओला कचरा जाळल्याने निर्माण झालेला काळा व दुर्गंधीयुक्त धूर आजूबाजूच्या अंबिका नगर, रोहीदास नगर, नागेश्वर मंदिर परिसरातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात पसरला. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला व दम लागण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला, वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुलांना व अस्थमा रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही. कचरा साचून राहतो आणि नंतर तो पेटवून दिला जातो. यापुर्वीही दोन वेळा या कचरा डेपोतील कचराला आग लावुन पेटवून दिल्याची घटना घडल्या आहेत. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,’ असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा डेपो कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची काटेकोर अंमलबजावणी करावी.
राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांनुसार, उघड्यावर कचरा जाळणे बेकायदेशीर आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या संदर्भात ग्रामविकास अधिकारी दिपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा कचरा पेटवून दिला असावा. याबाबत अधिक माहिती घेऊन ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
Pune News : रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू; हडपसर परिसरात एकच खळबळ






