बारामतीचा गड कोण जिंकणार (फोटो -टीम नवराष्ट्र)
बारामती/अमोल तोरणे: बारामती विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेत ७२.२७ टक्के मतदान झाले.वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? ,उपमुख्यमंत्री अजित पवार आपला अभेद्य गड राखणार की युगेंद्र पवार परिवर्तन करणार याबाबत बारामतीत विविध तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानात उतरवल्याने ही लढत मोठी रंगतदार ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मोठी ताकद पणाला लावल्याने मतदानाची आकडेवारी वाढल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि २०) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये बारामती शहरासह तालुक्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख ८०,६०८ एकूण मतदार असून यामध्ये पुरुष मतदार १,९२,८१९ तर स्त्री मतदार १,८७,७६५ आहेत, तर तृतीयपंथी २४ मतदार आहेत. या मतदारसंघातील १,४२,६९६ पुरुष मतदारांनी तर १,२८,४६२ स्री मतदारांनी व ११ तृतीयपंथी मतदारांनी असे एकुण २,७१,२६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार, याबाबत बारामतीकारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मते वाढलेल्या मतदानाचा फायदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच होणार असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांना आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बारामती मध्ये परिवर्तन अटळ असून युगेंद्र पवार बारामतीचे नवे आमदार होतील, असा दावा करत आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार तसेच त्यांचे दोन्ही चिरंजीव त्याचबरोबर त्यांच्या बहिणी देखील प्रचार यंत्रणेत सक्रिय होते. त्यांनी देखील लोकसभेतील झालेल्या चुका टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीका त्यांनी केली नाही. तशा सूचना देखील त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. “लोकसभेला सुप्रियाताई व विधानसभेला अजितदादा,”असेच जनतेने ठरवले असल्याचा उल्लेख अनेक सभांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी केला. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ जिरायती भागात घेतलेल्या सभा , तसेच शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील मतदारांशी भेटीगाठी घेतल्या.
खासदार सुप्रिया सुळे यादेखील मतदानाच्या आदल्या दिवशी देखील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होत्या, त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेकांच्या मते उपमुख्यमंत्री पवार यांनी बदललेल्या रणनीतीमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, मात्र युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे असलेली शरद पवारांची ताकद अजित पवार आव्हानात्मक आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेला झालेली जनतेची अलोट गर्दी यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती अजित पवार यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरली. या सभेमुळे अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा: Devendra Fadanvis: राज्यात मतदानाचा टक्का वाढला; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या-ज्या वेळेस…”
दरम्यान योगद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार व आई शर्मिला पवार यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर सुरक्षारक्षकाने अर्धा तास अडविल्याचा व्हिडिओ चांगला चर्चेत आला. अजित पवार यांनी आपल्या भाषणात प्रतिभा काकी माझ्या आईसमान असून सदर गेट हे लोडिंग लोडिंग साठी होते, असे स्पष्टीकरण दिले. मात्र या व्हायरल व्हिडिओ मुळे बारामती मध्ये चांगलेच वातावरण तापले. मतदानादिवशी बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेच्या मतदान केंद्रात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा कथित वादही माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला. एकंदरीत या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास अनेक राजकीय तज्ञ व्यक्त करत असले तरी युगेंद्र पवार यांच्या मागे असणारी शरद पवारांची ताकद कितपत युगेंद्र यांना फायद्याची ठरणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.






