"हम भी घुसकर मार सकते है...", १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्ट 'स्काय फोर्स' मध्ये दिसणार; दमदार ट्रेलर प्रदर्शित
मेडॉक फिल्म्सचा २०२५ मधील मोस्ट अवेटेड ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि वीर पहारिया स्टारर ‘स्काय फोर्स’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. कालच चित्रपटाचा पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करत ट्रेलरच्याही प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. वीर पहारियासाठी २०२५ हे वर्ष नक्कीच एकदम खास जाणार, यात शंका नाही. अगदी २०२५ च्या सुरुवातीलाच ट्रेलर रिलीज झाला आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.
१९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाच्या २ मिनिट ४९ सेकंदाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमारने आणि वीर पहारियाने भारताच्या हवाई दलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. काही तासांपूर्वीच ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये ट्रेलरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच ट्रेलरला इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर एअर स्ट्राइक केलं. पण, त्या मिशनमध्ये हवाई दलातला एक सैनिक हरवत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत. त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय हवाईदल काय काय करते ? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. शिवाय तो चित्रपटामध्ये जीवंत आहे की, मृत आहे ? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हरवलेल्या सैनिकाची भूमिका अभिनेता वीर पहारियाने साकारली आहे. त्याच्या आणि अक्षय कुमारच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
‘स्काय फोर्स’ चित्रपटात प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया सोबतच सारा अली खान, निम्रत कौर आणि शरद केळकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ या हॉरर युनिव्हर्स चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूरने केलेलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिकने केली आहे. दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मस या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. दरम्यान, ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शनिवार आणि रविवारी जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.