Aai Kuthe Kay Karte Actor Milind Gawali Visit To Sai Baba Temple In Shirdi
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रसिद्धी मिळवलीय. मालिका आणि चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहणारे मिलिंद गवळी कायमच चाहत्यांसोबत दैनंदिन जीवनातील अपडेट्स शेअर करत असतात.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मिलिंद गवळी यांनी शिर्डीमधील साई बाबांच्या दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये आरती केल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी चाहत्यांच्या भेटीचीही काही क्षण शेअर केले आहेत.
Big Boss 19: २४ ऑगस्टपासून सुरु होणार प्रसिद्ध रिॲलिटी शो, सलमान खानकडे नसेल ‘ही’ संपूर्ण जबाबदारी ?
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी काय म्हणाले ?
“मी माझ्या लहानपणापासून हेच ऐकत आलो आहे की शिर्डीच्या साईबाबाचं बोलणं येतं, आजीकडून आणि आईकडून हेच” मला ऐकायला मिळालं “मी नवसाचा आहे”, माझ्यासाठी आईने साईबाबांकडे नवस केला होता, अनेक वेळेला शिर्डीला गेलो, प्रत्येक वेळेला साईबाबांचा बोलूनच होतं ते, एकदा मी असं ठरवलं, माझं काम हीच माझी पूजा आहे, मी कुठल्याही देवळात जाणार नाही मी माझं काम प्रामाणिक करत राहणार, तेव्हाच मला एका सिरीयल साठी विचारण्यात आलं , आणि ती सिरीयल होती शिर्डीच्या साईबाबांवर, मला बायजाबाईचा मुलगा “तात्या कोते”चा रोल देण्यात आला होता, शिर्डीपासून दोन किलोमीटरवर एका शेतामध्ये संपूर्ण द्वारकामाईचा सेट लावला होता. अर्थातच साईबाबा यांचा रोल सुधीर दळवीच करत होते, तेव्हा पण माझ्या मनात आलं की बाबांनी मला शिर्डीला बोलावून घेतला आहे. मी चालत साईबाबांच्या मंदिरात जायचो, सिरीयल बनवणारे लोकं श्रद्धाळू किंवा बाबांचे भक्त नव्हते, दिवसाचे शूटिंग संपवून नित्यनियमाने दारू प्यायला बसायचे, मला ही गोष्ट खूप खटकत होती. सात आठ दिवसाचा शूटिंग झाल्यानंतर पाऊस वारा वादळ आलं आणि तो शेतामधला द्वारकामाईचा संपूर्ण सेट उद्ध्वस्त झाला. ती सिरीयल बंदच पडली. गेल्या आठवड्यापासून काही ना काही निमित्ताने बाबांचा विषय निघत होता, शिर्डीतल्या एका परिचयांचा फोन आला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीला या, एक बातमी वाचली समृद्धी हायवेने शिर्डीला अगदी अडीच- तीन तासामध्ये पोहोचतो, मनात आलं हे बाबांचं बोलवण आहे, माझ्या नवीन हिंदी मालिकेचं शूटिंग पण तीन- चार दिवस नव्हतं. आषाढी एकादशी पण होती, पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं, वाटलं शिर्डीला जाऊ, दीपाला म्हटलं सुट्टी आहे, शिर्डीला जाऊया का? एका पायावर तयार झाली, सकाळी गाडी काढली समृद्धी हायवेने शिर्डीला कधी पोहोचलो कळलं सुद्धा नाही. इडलीवड्याचा नाश्ता करायला शिर्डीत स्वामी मद्रासला गेलो, तर तिथे हॉटेलचे मालक विश्वनाथ (बाबा)अय्यर भेटले. ८० वर्षाचे अतिशय गोड प्रेमळ गृहस्थ म्हणाले, आषाढी एकादशीच्या चांगल्या दिवशी आला आहात मंदिरात धूप आरती करा, बाबांच्या दरबारात बाबांच्या अगदी समोर उभं राहून ४५ मिनिटं धुप आरती केली. आषाढी असल्यामुळे पांडुरंगाची पण पूजा झाली. खूप गोड आणि सज्जन माणसांच्या भेटी गाठी झाल्या, बाबा अय्यर, त्यांचा चिरंजीव प्रसाद, बजरंगी, इन्स्पेक्टर महेश, मंदिरातले पुजारी, कर्मचारी, आणि असंख्य सिरीयल बघणारे गोड प्रेक्षक. असंख्य लोकांचे प्रेम, गोड आठवणी घेऊन, साईबाबांचा आशीर्वाद घेऊन, माझ्या नवीन कामासाठी भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही दोघं परत घरी पोहोचलो. सचितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय…”