Aadesh Bandekar Responsed Through Video About Health Rumors Mumbai News
झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या आदेश बांदेकरांबद्दल एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते सध्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कमालीचे संतापले आहेत. त्या खोट्या बातम्यांचा फक्त भावोजींनाच नाही तर, संपूर्ण त्यांच्या कुटुंबीयांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर आदेश बांदेकर यांच्या प्रकृतीबाबतचे खोटे वृत्त पसरवले जात आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आणि आप्तेष्टांनी त्यांना संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. पण त्यावेळी त्यांची तब्येत सुखरुप असून व्हायरल होत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचं कळालं. अखेर आदेश बांदेकर यांनी जवळच्या लोकांसह चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सुखरूप असल्याची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
चिखलात अडकलेल्या चिमुरडीसाठी दिशा पाटनीची बहीण बनली देवदूत, बेवारस मुलीचे वाचवले प्राण
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदेश भावोजींनी आपल्या तब्येतीबद्दल म्हणाले की, आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचाही समाचार घेताना म्हणाले की,
“मी अत्यंत व्यवस्थित आणि सुदृढ आहे. सुखरुप प्रवास करतोय, कारण काळजीपोटी इतक्या जणांचे मला फोन येत आहेत आणि जे संपर्क साधू शकत नाहीयेत ते हळहळ व्यक्त करत आहेत. यामागील कारणही तसेच आहे. आपले खूप हितचिंतक असतात तसेच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवत असतात. आता ही वृत्ती आहे या वृत्तीला कोणी काही करू शकत नाही. बरं, बातम्या पसरवत असताना आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथंपासून ते अगदी निधनापर्यंत, श्रद्धांजली सुद्धा काही जणांनी अर्पण केल्या आहेत. हे सारं काही माझ्यापर्यंत होते तोपर्यंत ठीक होते, मी हसण्यावारी नेले. या सर्व वृत्तीकडे दुर्लक्ष करत होतो. पण आताच मी सोशल मीडियावर पाहिले तर मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्गज, अनेक कलावंत जे इतके काम करत आहेत, प्रवास करत आहेत. त्यांच्याबाबतच्या बातम्या सुद्धा अशाच होत्या. कोणाचा घाटात अपघात झाला, संपूर्ण बसचा अपघात झाला तर कोणाला थेट पोहोचवण्यापर्यंत. आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, असं मला वाटतं. पोहोचवयाचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे. ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर स्वतःचे व्ह्युज वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून चार पैसे कमावण्याचा हा जो धंदा आहे ना तो बंद पाडायचा असेल तर याला जास्तीत जास्त लोकांनी रिपोर्ट केले पाहिजे. कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे आणि त्यांच्यामुळे कोणाचं तरी नकळत नुकसान होऊ शकते. तेव्हा या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी असे मला मनापासून वाटतं आणि किमान 25 ते 30 मराठी इंडस्ट्रीतल्या कलावंताबद्दल अशा पद्धतीची बातमी आपल्याआपल्या पेजवर टाकणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. हसावं नाही तर काय करावे? मी मात्र व्यवस्थित – सुदृढ आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या काळजी पोटी मला फोन केला, सर्वांना सांगतो मी व्यवस्थित आहे”