महानायक अशोक सराफ यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री, 'अशोक मा.मा.' चा प्रोमो पाहिलात का ?
‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमाची आज सांगता होत आहे. पण प्रेक्षकांच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनयसम्राट, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ घेऊन येत आहेत एक नवी मालिका ‘अशोक मा.मा.’. अशोक मामांची ही नवीकोरी मालिका तुफान एंटरटेनिंग असणार यात काही शंका नाही.
हे देखील वाचा – बिग बॉसची मोठी खेळी, टॉप ६ मधून जान्हवी किल्लेकर बाहेर; मिळाले लाखो रुपये
‘येतोय महाराष्ट्राचा महानायक’ म्हणत ‘कलर्स मराठी’ने काही दिवसांपूर्वी ‘अशोक मा.मा.’ या मालिकेची पहिली झलक समोर आणली होती. अशातच आता या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा नवा प्रोमो समोर आला आहे. शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे ‘अशोक मा.मा.’ म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्यावेळी पुन्हा कामावर येते.
त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीन थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यातला हा वादाचा गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची मात्र उत्कंठा वाढवतोय. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळे या मालिकेत अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय.
‘अशोक मा.मा’ या मालिकेच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा घेऊन टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा सज्ज आहेत. शिस्तप्रिय असणारे ‘अशोक मा.मा.’ आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार ऐवढं मात्र नक्की.. ‘अशोक मा.मा’ या मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.
हे देखील वाचा – रितेश देशमुख दोन आठवडे कुठे होता ? अखेर केला खुलासा






