"मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी..." २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत
अभिनेता किरण माने ह्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिनही माध्यमातून अभिनेत्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने २०२४ वर्षाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. फिल्मी करियरमध्ये २०२४ या वर्षात मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये कलाकार मंडळी दाखवणार पाक कौशल्य, कोण कोण सेलिब्रिटी होणार सहभागी ?
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने मालिकेमध्ये साकारलेल्या पात्रांचे फोटो पोस्ट केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले की,
” ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतल्या अभिमान साठे या भुमिकेसाठी मिळालेलं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं अवार्ड… सन मराठीवरील ‘तिकळी’ मालिकेत साकारलेला बाबाराव खोत हा खतरनाक व्हिलन… कलर्स मराठीवरील सध्या सुरू असलेल्या ‘लई आवडतेस तू मला’ मध्ये साकारत असलेला तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, कणखर कामगार नेता आणि तेवढाच हळवा बाप आप्पा धुमाळ… रिलीज झालेले ‘तेरवं’ आणि ‘नाद’ हे सिनेमे… आणि नवीन वर्षात येऊ घातलेल्या आणखी तीन जबरदस्त सिनेमांमधील तगड्या भुमिका… हे सरत्या वर्षाचं अभिनयक्षेत्रातलं संचित ! परिवर्तनाच्या चळवळीत महाराष्ट्रभर फिरुन दिलेली असंख्य व्याख्यानं…”
“धुळ्यापासून हुपरीपर्यंत, अंमळनेरपासून भोरपर्यंत आणि नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत पायाला भिंगरी लावून केलेलं तथागत बुद्ध, तुकाराम महाराज आणि शिव शाहु फुले आंबेडकरी विचारांच्या प्रसाराचं मनाला आनंद देणारं काम… ‘माणूस’पण संकटात आणणार्या काळात निडरपणे पसरवलेला मानवतेचा, सलोख्याचा, प्रेमाचा संदेश… विद्रोही साहित्य संमेलनातल्या भाषणानंतर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेऊन केलेला जल्लोष… प्रबोधनकार ठाकरेंचा विचार काळजात घेऊन थेट मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत केलेला प्रवेश… लोकसभा निवडणुकीत वादळी प्रचारसभांमध्ये सहभाग घेऊन, ‘चारसो पार’चा माज उतरवण्यात उचललेला खारीचा वाटा…”
“इव्हीएम घोटाळ्यामुळे कलंकीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कष्टकरी बहुजनांच्या सन्मानासाठी दिलेली कडवी झुंज… तमाम महाराष्ट्रानं दिलेलं सह्याद्रीएवढं प्रेम… ज्यात आवड आहे, ज्याचा ध्यास आहे अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये रसरसून, मनमुराद, दिलखुलास केलेल्या मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलं ! वर्ष संपता-संपता मिळालेला ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ म्हणजे, “तुका म्हणे झाले सायासाचे फळ… सरली ते वेळ काळ दोन्ही !” नव्या वर्षात नव्या दमानं नवी आव्हानं झेलून… हसतमुखानं सगळ्या संकटांना धोबीपछाड देऊन… यशाचा झेंडा असाच फडकत ठेवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ सोबत घेऊन सज्ज झालोय.”
पुन्हा एकदा हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांना खळखळून हसवणार, चित्रपटातून देणार धमाल मनोरंजनाची ट्रीट