मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा येतोय, ‘मूषक आख्यान’ दिवाळीत करणार जबरदस्त धमाका
अभिनेता मकरंद अनासपुरे नेहमीच काही नवे देत असतात. ‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. 147 मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर लाँच आणि टीझर रिलीजचा सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.
‘देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.
हे देखील वाचा – मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये कमाल लुक पाहून चाहते घायाळ!
‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव हे प्रमुख भूमिकेत आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया, अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्कचित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्कचित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत. संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे.