फोटो सौजन्य - Social Media
ऋतूंचं चक्र निसर्गाला प्रत्येक वेळी नवे रंग, रूप आणि छटा देतं. वसंतातील फुलांचा बहर, पावसाचा साज, हिवाळ्याची थंडी किंवा उन्हाळ्याची कडक झळ. प्रत्येक ऋतू मनाला वेगळीच अनुभूती देतो. माणसाचं आयुष्यही तसंच सतत बदलत राहतं. कधी आनंदाचे क्षण, कधी संघर्षाचे टप्पे, तर कधी भावनांचे रंग यामुळे जीवन प्रवाही होतं. या प्रवासात जर जिवलगाची सोबत मिळाली, तर प्रत्येक ऋतू अधिक सुंदर, भावपूर्ण आणि संस्मरणीय ठरतो. या भावनेलाच शब्द आणि सूरांची कवचं देणारं एक वेगळं प्रेमगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे ‘ऋतुचक्र’.
हे गाणं खास ठरतं कारण यात प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हृदयाला भिडणाऱ्या शब्दरचना आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या मधुर स्वररचना यांचा अप्रतिम मिलाफ आहे. गायक साहिल कुलकर्णी आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली गायिका स्वानंदी सरदेसाई यांच्या गोड आवाजामुळे गाण्याला भावनांची नव्याने झळाळी मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील कोमलता, गोडवा आणि निसर्गाशी मिळणारा भावनिक सूर श्रोत्यांच्या मनात घर करून राहतो.
‘दशावतार’ या बहुचर्चित चित्रपटातील हे गाणं असून, ते प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन या लोकप्रिय जोडीवर चित्रित करण्यात आलं आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री गाण्यात खुलून दिसते. कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी झालेलं चित्रीकरण या गाण्याचं आणखी एक आकर्षण आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, स्वच्छ नद्या, समुद्रकिनारे आणि कोकणाचा अद्वितीय नजारा गाण्यातून प्रेक्षकांसमोर जिवंत होतो. यामुळे गाणं केवळ प्रेमगीत न राहता, निसर्ग आणि प्रेमाचा सुसंवादी संगम ठरतो.
गीतकार गुरु ठाकूर सांगतात, “प्रेम ही स्थिर भावना नसून ती परिस्थिती आणि काळानुसार बदलत राहते. या गाण्यातून ऋतूंप्रमाणे बदलणाऱ्या प्रेमछटांना मी शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.” तर संगीतकार प्रफुल्लचंद्र म्हणतात, “या गाण्याच्या स्वरांत निसर्गाची गोडी, ऋतूंची मृदुता आणि प्रेमातील कोमलता यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.” झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव आणि विजय केंकरे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १२ सप्टेंबर रोजी येणार आहे. ‘ऋतुचक्र’ या गाण्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली असून, प्रेक्षकांना निसर्ग आणि प्रेमाचा नव्यानं अनुभव देणारं हे गीत दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी अपेक्षा आहे.