‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरीही अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत:च व्यक्त केली मनातली खदखद
अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने महत्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटासाठी अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सर्वच स्तरातून चित्रपटाचे कौतुक झाल्यानंतर, ‘पुष्पा २: द रूल’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने पुरस्कार मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षाने त्या पुरस्कारासंबंधित भाष्य केले आहे. अल्लू अर्जुनने सांगितले की, जेव्हा त्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो दु:खी होता. त्या मागील कारणही त्याने सांगितलं आहे.
अल्लू अर्जुनने अनस्टॉपेबल एनबीकेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “मी दिग्दर्शक सुकुमार यांना एक गोष्ट सांगितली होती की, हा चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला तरी मला याची पर्वा नाही. मला फक्त या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, अशी माझी इच्छा आहे.” “टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एका अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तू म्हटला होतास की, आम्ही व्यावसायिक चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावरील मान मिळवू आणि तू हे करूनही दाखवले, तर आता तुला यावर काय वाटते?” असा प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आला होता.
या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला,“एकदा मी राष्ट्रीय पुरस्कारांची यादी वाचत होतो, त्यावेळी मला त्यात एकही तेलुगू नाव दिसले नाही. यावर मी विचार करत होतो. तेलुगू इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. मी फक्त नागार्जुन सरांचेच नाव पाहिले होते, पण तेही एका खास भूमिकेसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणीच नव्हते. अजून पुरस्कार कोणत्याही कलाकाराला का मिळाले नाही? इंडस्ट्रीतले कलाकार यामध्ये मागे कसे राहिले? जुन्या कलाकारांचे काय? टॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी आहेत, मग आम्हाला पुरस्कार कसा मिळाला नाही? या प्रश्नांनी माझ्या मनात घर केले होते”असे अल्लू अर्जुनने मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- “दफन करून आलास ना त्याला…”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
अल्लू अर्जुनने पुढे सांगितले की, “जेव्हा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा मी आनंदी होण्याऐवजी दु:खी होतो. माझ्या डोक्यात सतत एक गोष्ट फिरत होती ती म्हणजे, हा पुरस्कार जिंकण्यासाठी तेलुगू कलाकारांना इतका उशिर का झाला. सुकुमार आणि मी जेव्हा पुष्पासाठी नियोजन सुरू केले तेव्हाच मी मनात ठरवले होते की, मला राष्ट्रीय पुरस्काराला मिळवायचाच आहे. मी याआधी याबद्दल कुणालाही काही सांगितले नव्हते. मी पहिल्यांदाच हे सांगत आहे. सुकुमारला मी म्हणालो होतो, पुष्पा चित्रपट जास्त चालला नाही तरी चालेल. मात्र यासाठी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार नक्की जिंकायचा आहे. त्यासाठी तू मला मदत कर.”