फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या आईच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे ही बातमी सर्वांना देण्यात आली आहे. अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचे शुक्रवारी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी निधन झालं आहे.
हेमवंती देवी ८९ वर्षांच्या होत्या आणि गेल्या काही काळापासून आजारी होत्या. वयाच्या ८९ व्या वर्षी हेमवंती देवी यांनी अंथरुणावर अखेरचा श्वास घेतला. पंकज त्यांच्या आईच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत होते. शनिवारी बेलसंड येथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगानंतर संपूर्ण त्रिपाठी कुटुंब शोककळेत बुडालं आहेत.
कुटुंबाने सर्वांना विनंती केली आहे की, श्रीमती हेमवंती देवी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसेच, या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा आणि त्यांना शांततेत शोक व्यक्त करण्यासाठी वेळ द्यावा, अशीही नम्र विनंती करण्यात आली आहे.
२१ ऑगस्ट २०२३ रोजी वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचेही निधन झाले होते.त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईत ‘ओएमजी 2’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. पण ही दुःखद बातमी समजताच त्यांनी सर्व काम थांबवून तत्काळ बिहारला परत जात वडिलांच्या अंत्यसंस्कारास उपस्थिती लावली.पंकज त्रिपाठींना त्यांच्यावडिलांकडूनच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिस्त लाभली होती. त्यांचे वडील हे एक पूजारी आणि शेतकरी होते. लहानपणी पंकज स्वतः शेतीकामात वडिलांना हातभार लावत असत.
बिहारच्या छोट्या गावातून सुरू झालेला पंकज त्रिपाठी यांचा अभिनय प्रवास आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे. सुरुवातीला मुंबईत संघर्षाचा काळ पार केल्यानंतर, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून त्यांना अभिनय क्षेत्रात मोठी ओळख मिळाली.
त्यांनी ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘मिर्झापूर’, ‘मिमी’ आणि ‘ओएमजी 2’ यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे प्रामाणिकपणा, सहज संवादशैली आणि जमिनीशी जोडलेली व्यक्तिरेखा.
2023 मध्ये त्यांनी ‘मिमी’ चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.






