(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संगीत, जागरुकता आणि आध्यात्मिकतेचा अद्वितीय संगम असलेले ‘डिव्हाइन सरेंडर द बुद्धिस्ट अँथम ऑफ पीस, अवेकनिंग अँड कंपॅशन’ हे गीत चर्चगेटमधील डाऊनटाऊन 20 हॉलमध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आले.
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेल्या शांतता, आत्मबोध आणि करुणा या मूल्यांचा संदेश अंतर्भूत आहे. या गीतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले अभिनेते गगन मलिक यांनी प्रतीकात्मक भूमिका साकारली आहे, तर सुप्रसिद्ध बौद्ध संगीतकार पावा यांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केले असून ध्यान, संगीत आणि जागरूकतेचा अद्वितीय संगम साधत त्यांनी हे गीत अधिक प्रभावी केले आहे. या आध्यात्मिक निर्मितीमध्ये दिग्दर्शक निराज प्रभाकर यांनी कलात्मकतेची भर घातली आहे आणि युगंधर क्रिएशन्सच्या अनिकेत बडोले यांनी या गीताची निर्मिती केली आहे. हे गीत थाई, व्हिएतनामी, श्रीलंकन, कंबोडियन, बांगलादेशी अशा अनेक भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.
आग्नेय आशियातील प्रतिष्ठित स्टुडिओंपैकी एक असलेल्या बँकॉकमधील स्टुडिओ 28 मध्ये हे गीत रेकॉर्ड करण्यात आले असून भव्य सिंफनी ऑर्केस्ट्राच्या सुरावटींमुळे पूर्वेकडील आध्यात्मिकता आणि जागतिक ऑर्केस्ट्रल संगीताची सांगड घातली गेली आहे. बुद्धांची शाश्वत शिकवण संगीतासारख्या वैश्विक भाषेतून साजरी करत विविध संस्कृतींना जोडणारा कलात्मक सेतू म्हणून या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. युगंधर क्रिएशन्सतर्फे सादर करण्यात आलेले ‘डिव्हाइन सरेंडर’ हे संगीत, अध्यात्म आणि जागतिक ऐक्य यांना एका मंचावर एकत्र आणणारी एक कलात्मक भेट आहे.
या गीताच्या लाँचच्या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. रॉयल थाई कॉन्स्युलेट, मुंबईचे कॉन्सुल-जनरल श्री. डॉनाविट पूल्सवात आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून श्रीलंकेच्या कॉन्सुल-जनरल शिराणी अरियारत्ने, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, सिद्धिविनायक सिने आर्ट्स (प्रा.) लिमिटेडच्या चेअरपर्सन कौशल्या विक्रमसिंघे, तसेच थायलंडचे उद्योजक आणि संशोधक ॲक्ट. कॅप्टन नट्टाकिट चायचलेर्ममोंग्खोन आणि युगंधर क्रिएशन्सचे निर्माते श्री. अनिकेत बडोले उपस्थित होते. तसेच या गीताचे संगीतकार व गायक पावा, ख्यातनाम अभिनेते गगन मलिक आणि ‘डिव्हाइन सरेंडर’ म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक निराज प्रभाकर यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली.
प्रेमाला वय नसतं! लैंगिक छळाचे आरोप होऊन देखील ‘या’ गायकाने थाटला दुसरा संसार; थेट 16 वर्षांनी लहान…






