(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
फिल्मफेअरसोबत रेणुका शहाणे यांचा प्रवास जवळपास तीन दशकांनंतर अतिशय सुंदररीत्या पूर्ण वर्तुळात आला आहे. १९९५ मध्ये मराठी चित्रपट अबोलीसाठी अभिनेत्रीला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, आणि त्या काळात मराठी सिनेमा अजून आपली ओळख निर्माण करत होता आणि त्या सुरुवातीच्या सन्मानाने त्यांच्या कलात्मक प्रवासाची आशादायक सुरुवात झाली. आज, २९ वर्षांनंतर, शहाणे यांना ‘धावपट्टी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि ‘दुपहिया’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट आणि कथाकथन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण प्रभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या महत्त्वाच्या टप्प्यावर भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “१९९५ मध्ये अबोलीसाठी मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार हा मराठी चित्रपटासाठी मिळालेला माझा पहिला पुरस्कार होता. त्या काळात मराठी सिनेमा अजून विकसित होत होता आणि फिल्मफेअर जिंकणे म्हणजे माझ्या प्रवासाची एक उज्ज्वल सुरुवात होती. २९ वर्षांनंतर दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळणे हे शांत, पण अत्यंत प्रभावी घरवापसीसारखे होते. जे वाढ, सातत्य आणि कलेवरील प्रेमाचे प्रतिबिंब करते.”
रेणुका शहाणे यांचा हा ‘लूप लाइन’ हा ॲनिमेटेड लघुपटाचं मराठीत ‘धावपट्टी’ असं नाव आहे. हा लघुपटात एका गृहिणीच्या आयुष्यातील पूर्ण एक दिवस दाखवला आहे. तिचं तिच्या जोडीदारासोबत फार काही चांगलं नातं नाही. ती करत असलेल्या कामासाठी तिचे आभार तर मानले जात नाहीतच, उलट तिला अगातद्वा बोललं जातं. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी ती काल्पनिक विश्वात रमू लागते. ती स्वतःला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहते; जे तिच्या खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळे आणि सुंदर असतं. तिची तुलना मुंबई लोकलशी केली आहे. पूर्ण मुंबई लोकलवर अवलंबून असते. आपण तिला गृहित धरले जाते. पण ती ‘लाइफलाइन’ आहे. तसंच त्या स्त्रीचंही आहे. तीही घराची लाइफलाइन आहे.






