दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; चार गोळ्या झाडल्या, पोलिसांनी वाढवली सुरक्षा
मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याची माहिती दिली जात आहे. रात्री उशिरा हा गोळीबार झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार गोळीबाराचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना तातडीने पाचारण करण्यात आले.
पोलिसांना या गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, विभागीय पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांनीही माहिती दिली आहे. “रोहित शेट्टीच्या इमारतीत गोळीबार झाला आहे. आम्ही याप्रकरणाचा तपास करत आहोत. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी सर्व शक्य बाजूंनी तपास केला जात आहे. सध्या रोहित शेट्टीच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे”.
हेदेखील वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांनी उलगडला बिर्ला कुटुंबाचा नैतिक पाया, बिग बींनी वाचले ९० वर्ष जुने ऐतिहासिक पत्र
दरम्यान, या गोळीबारात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. किंवा यामध्ये कोणीही जखमीही नाही. असे जरी असले तरी रोहित शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेरील एक व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलिसांकडून घटनेचे तपास सुरु
सध्या पोलिसांनी या प्रकरणात हल्ल्याचे कोणतेही अधिकृत कारण अथवा अंदाज व्यक्त केला नाही. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल असे म्हटले आहे. रोहित शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बॉलिवूड स्टार्सच्या सुरक्षिततेबद्दल आधीच चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरु आहे.
हेदेखील वाचा : ‘Golmaal 5’ साठी स्टारकास्ट फायनल? अजय देवगणसह 5 स्टार्स करणार धमाल, पहिल्यांदाच होणार खलनायिकेची एन्ट्री






