(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर महानायक अमिताभ बच्चन यांनी बिर्ला कुटुंबाचा ९० वर्ष जुना पत्र वाचलं, ज्यामध्ये थोर उद्योगपती जी. डी. बिर्ला यांनी आपले सुपुत्र बी. के. बिर्ला यांना व्यवसाय, चारित्र्य, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीबाबत मार्गदर्शन दिले होते. या पत्रात सांगितलं होतं की संपत्तीचा खरा उपयोग समाजसेवा आणि जनकल्याणासाठी व्हावा, सत्तेचा अहंकार टाळावा, आणि आरोग्य ही खरी श्रीमंती आहे.
१. संपत्ती: चैन नव्हे, तर समाजऋण फेडण्याची जबाबदारी
संपत्ती ही चंचल आहे आणि ती आज ना उद्या संपणारच, याची जाणीव हे पत्र कडक शब्दांत करून देते. जी. डी. बिर्ला यांनी आपल्या मुलाला निक्षून सांगितले होते की, पैशाचा वापर कधीही केवळ “छंद किंवा विलासासाठी” करू नकोस, कारण संपत्ती कायम टिकतेच असे नाही. संपत्तीचा खरा उपयोग हा सेवा, जनकल्याण आणि दुःखी माणसांचे अश्रू पुसण्यासाठीच व्हावा, असा आदेश त्यांनी आपल्या मुलाला दिला होता.
२. सत्तेची धुंदी आणि अन्यायापासून सावधान
संपत्तीसोबत सत्तेचा अहंकार येतो, हे ओळखून जी. डी. बिर्ला यांनी मुलाला “पैशाच्या नशेपासून” सावध केले होते. या नशेमुळे माणसाकडून अन्याय होऊ शकतो. आपल्या पैशामुळे कोणावरही अनावधानाने अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी पुढच्या पिढीला केले. बिर्ला कुटुंबाचा व्यवसाय हा अपार कष्टातून केवळ यासाठीच उभा राहिला आहे, जेणेकरून त्यातून मिळालेली संपत्ती लोककल्याणाच्या कामी येईल, याची त्यांनी पत्रात आठवण करून दिली.
३. आरोग्य: जीवनातील सर्वात मोठी पुंजी
१९३४ च्या या पत्राचा एक मोठा भाग शारीरिक आरोग्याला समर्पित होता. जी. डी. बिर्ला यांनी आरोग्यालाच “खरी श्रीमंती” मानले. त्यांच्या मते, आरोग्य नसेल तर अब्जावधींच्या मालमत्तेचा मालकही “दु:खी व असहाय्य” ठरतो. त्यांनी आहार, योग आणि व्यायामाची कडक शिस्त आखून दिली होती. शरीर सदृढ असेल तरच कामामधील कार्यक्षमता वाढते, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी जीवनशैलीबद्दल दिलेला तो प्रसिद्ध मंत्र आजही तितकाच मोलाचा आहे: “अन्न हे औषधासारखे खा; केवळ जिभेच्या चवीसाठी खाऊ नका.”
४. आजही श्वास घेणारा एक ‘जिवंत’ वारसा
कुमार मंगलम बिर्ला यांनी भावूक होत सांगितले की, त्यांचे आजोबा बी. के. बिर्ला हे अक्षरश: या पत्रातील शब्दांनुसारच आपले आयुष्य जगले. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे वारस असूनही त्यांनी साधेपणा आणि निष्ठा कधीच सोडली नाही. आजच्या आधुनिक भारतासाठी हे ९० वर्षांपूर्वीचे पत्र केवळ कागदाचा तुकडा नसून ‘विश्वस्त’ या संकल्पनेचा एक वस्तुपाठ आहे. एखाद्या जागतिक उद्योग समूहाची खरी ताकद ही केवळ त्याच्या आर्थिक उलाढालीत नसते, तर ती संस्कारांच्या त्या अदृश्य मुळांमध्ये आणि कठोर स्वयंशिस्तीत असते, हेच बिर्ला घराण्याने जगाला दाखवून दिले आहे.
कौटुंबिक जिव्हाळा आणि काही हळव्या आठवणी
कार्यक्रमाच्या ओघात बिर्ला कुटुंबातील नात्यांचे काही अतिशय खाजगी आणि हळवे पैलू समोर आले. श्री. कुमार मंगलम बिर्ला यांची धाकटी मुलगी अद्वैतेशा हिने एका गुपिताचा उलगडा केला. ती म्हणाली, “बाबा कामात कितीही व्यस्त असले तरी त्यांचे आमच्यावरचे लक्ष कधीच कमी झाले नाही. मी जेव्हा शिक्षणासाठी परदेशात होते, तेव्हा ते दिवसातून पाच वेळा मला फोन करायचे.” यातून एका मोठ्या उद्योजकातील हळवा आणि काळजीवाहू पिता सर्वांना पाहायला मिळाला. या बाप-लेकीला जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे चित्रकला. आजही ते दोघे वेळ काढून एकत्र पेंटिंग करतात.
त्यांनी एका बालपणीच्या आठवणीला उजाळा देताना सांगितले की, १९७८-७९ मध्ये ते केवळ १०-११ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये ‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. अनेक दशकांनंतर, आज पुन्हा त्याच महानायकासमोर ‘हॉट सीट’वर बसल्याने जणू नियतीचे एक वर्तुळ आज पूर्ण झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.






