(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांचे निधन झाले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, शबाना आजमी, संजय दत्त, सलमान खान. रणवीर सिंह -दीपिका पादुकोण असे अनेक सेलिब्रिटि स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आले होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने फक्त बॉलिवूड नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टी देखील शोकसागरात बुडाली आहे.
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सचिन पिळगावकर यांनी त्यांचा आणि धर्मंद्र यांचा एक जुना फोटो शेअर केलाय आणि लिहिले, “सर्वात हँडसम, धरम जी! दिग्गज आपल्याला सोडून गेले आहेत , पण त्यांचा वारसा कायमचा उंच मानेने उभा राहील. अभिनेता म्हणून तीन चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची आणि ‘रेशम की दोरी’ मध्ये त्यांच्या बालपणाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे. खरा हिमॅन आपल्या हृदयात कायम राहील,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ सिनेमात सचिन पिळगावकर होते. याआधी १९६७ साली त्यांनी धर्मेंद्र यांच्या ‘मझली दीदी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. यामध्ये मीना कुमारी मुख्य अभिनेत्री होत्या.
धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
सिनेमातील योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावावर मोठा विक्रम तयार केला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
“घायल” हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, ओम पुरी आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला 1990 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.






