सलमानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी (फोटो सौजन्य-X)
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स गेजकडून धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात सलमानसाठी धमकीचा मेसेज आला. हा धमकीचा मेसेज गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आला. ‘सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई’वर एक गाणे लिहिण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. धमकी देताना त्यांनी गाणे लिहिणाऱ्यालाही सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.
एका महिन्याच्या आत गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला मारले जाईल, गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीची स्थिती अशी होईल की तो स्वत:च्या नावाने गाणे लिहू शकणार नाही. सलमानमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे. हा इशारा या धमकीमध्ये लिहिला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धमकी कोणत्या क्रमांकावरून आली याचा शोध घेण्यात पोलीस घेत आहेत. मात्र, हे गाणे कोणते आहे आणि कोणी लिहिले आहे… ही माहिती धमकीच्या संदेशात देण्यात आलेली नाही.
गेल्या महिन्याभरापासून सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अलीकडेच सलमान खानला मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या धमकीमध्ये सलमान खानला हरण शिकार प्रकरणी मंदिरात जाऊन माफी मागावी आणि 5 कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
हे सुद्धा वाचा: ‘क्राइम पेट्रोल’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सलमान खानने 1998 मध्ये राजस्थानमध्ये ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाचे शूटिंग केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान शूटिंग संपल्यानंतर एका रात्री जोधपूरमध्ये शिकारीसाठी गेला होता, असा आरोप आहे. त्या रात्री सलमानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे काळे हरण बिश्नोई समाजात अत्यंत पूजनीय मानले जाते. त्यामुळेच काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचे नाव येताच बिष्णोई समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 2018 मध्ये जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, मात्र दोन दिवसांनी सलमान खानची जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे संतापलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खानचा कट्टर शत्रू राहिला आहे.
एका टीव्ही मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई म्हणाले होते की, जर सलमान खानने राजस्थानमधील बिकानेर येथील बिश्नोई समाजाच्या मुख्य मंदिरात येऊन काळवीट शिकार प्रकरणावर माफी मागितली तर त्याच्या खात्याबाबत काहीतरी विचार केला जाईल. मात्र, सलमान खानने याबाबत अद्याप माफी मागितलेली नाही किंवा कोणतेही वक्तव्य केलेले नाही. काही काळापूर्वी सलमान खानच्या मुंबईतील घरावरही गोळीबार झाला होता. गेल्या महिन्यात सलमान खानच्या जवळच्या बाबा सिद्दिकीचीही मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले आहे.
गुरुवारी सलमान खानसोबतच अभिनेता शाहरुख खानलाही फैजान नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी रायपूर, छत्तीसगडचा रहिवासी असून त्याने शाहरुख खानला धमकीचा फोन केला होता.
या धमक्यांच्या दरम्यान अभिनेता त्याच्या सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो हैदराबादमध्ये शूटिंग करत आहे. त्यामुळे सलमान खान बिग बॉसच्या आगामी वीकेंड का वारचे शूटही चुकवले आहे. त्याच्या जागी एकता कपूर आणि रोहित शेट्टी हा शो होस्ट करणार आहेत. शोचे प्रोमोही समोर आले आहेत. याआधीही अनेक सेलिब्रिटींनी सलमानच्या अनुपस्थितीत रिॲलिटी शो होस्ट केले आहेत. धमक्यांना न जुमानता सलमान खानने कामाशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. कडेकोट बंदोबस्तात तो चित्रपट आणि बिग बॉसचे शूटिंग करत आहे. सिकंदर या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.
हे सुद्धा वाचा: एकता कपूर घेणार विवियन डीसेनाची शाळा, म्हणाली हा कामाचा घमंड…