(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेला ‘आर. के. लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ यावर्षी प्रथमच प्रदान केला जाणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथे दुपारी ३ वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचा पहिला मान अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आमिर खान याला त्याच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील विलक्षण योगदानाबद्दल दिला जाणार आहे, अशी माहिती उषा लक्ष्मण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विशेष कार्यक्रमात ए. आर. रहमान, हरीहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी यांची थेट सादरीकरणे होणार आहेत. रहमान यांच्या संगीतावर हजारो प्रेक्षक झिंगणार असून, हा पुण्यातील पहिलाच असा स्टेडियम कॉन्सर्ट ठरणार आहे.
उषा लक्ष्मण यांनी सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा केवळ संगीतप्रेमींसाठीच नव्हे, तर कला आणि सर्जनशीलतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी खास अनुभव ठरणार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या चिकाटी, सर्जनशीलता आणि उद्देशपूर्णता या मूल्यांना जपणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्याचा हेतू आहे.”
हा अनोखा कार्यक्रम आर. के. लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, यात कला, संस्कृती आणि संगीत यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.
कोण आहे अभिनेता आमिर खान?
आमिर खान हा असा बॉलिवूड स्टार आहे, जो एका वर्षात एकच चित्रपट पडद्यावर आणतो आणि तो सुपरहिट ठरतो, पण गेल्या काही वर्षांपासून या अभिनेत्याचे नशीब त्याला पडद्यावर साथ देत नाही आहे. 2022 मध्ये आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटातील गाणी मात्र चाहत्यांना खूप आवडली. याआधी आमिर खान कतरिना कैफसोबत ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसला होता, हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता. आमिर केवळ चित्रपटांमध्येच फ्लॉप ठरत नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही तो गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकटाच आहे.






