(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
ZEE5 हा भारतातील सर्वात मोठ्या होम- ग्रोन व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक प्लॅटफॉर्म आहे. आज या प्लॅटफॉर्मने ‘द सिग्नेचर’ या नव्या सिनेमाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनुपम खेर, महिमा चौधरी, नीना कुलकर्मी, अन्नू कपूर आणि रणवीर शौरी असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. ‘द सिग्नेचर’मध्ये आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या संकटात तिला वाचवण्यासाठी अविरत लढणाऱ्या पतीची भावनिक गोष्ट पाहायला मिळणार आहे. पण हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे त्यानं केलेला सर्व त्याग पणाला लागतो. के. सी. बोकाडिया आणि अनुपम खेर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात प्रेम, त्याग, आशा, संघर्ष आणि मानवी ताकद अशा वेगवेगळ्या भावनांचं चित्रण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना 4 ऑक्टोबरपासून ZEE5 वर हा सिनेमा स्ट्रीम करता येणार आहे.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरविंद (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेल्या परदेशात सहलीला निघालेले असतात. मात्र, अचानक विमानतळावर त्यांची पत्नी कोसळते. मध्यमवर्गीय उत्पन्नातून वाचवलेला सगळा पैसा तिला वाचवण्यासाठी खर्च करण्याचं ठरवतात. दुरावलेली मुलं आर्थिक मदत देण्याचं नाकारत त्यांच्या सह- मालकीचं घर विकायलाही नकार देतात. ते आपले जवळचे मित्र, जुन्या परिचितांकडे पैसे मागतात आणि ते ही अशा कठीण काळात त्यांची मदत करायला येतात. अशातच डीएनआर फॉर्म (Do Not Resuscitate) भरायची वेळ आल्यामुळे हा भावनिक संघर्ष आणखी तीव्र होतो. वेळ आल्यानंतर तिला जाऊ द्यायचं की आशेवर कायम राहायचं अशा विचित्र कात्रीत ते अडकतात. ते कशाची निवड करतील? आणि त्यासाठी काय किंमत द्यावी लागेल? हे सगळं या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ZEE5 चे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनीश कालरा या चित्रपटाबद्दल म्हणाले, ‘ZEE5 ने जगभरातील प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण, आपल्याशा वाटणाऱ्या, दिलखेचक गोष्टी सादर करण्याचे ध्येय ठेवले आहे. द सिग्नेचर या सिनेमातून आम्ही पॅन भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून यातून प्लॅटफॉर्मने वेगवेगळ्या प्रकारचा प्रेक्षकवर्ग मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. अशा प्रकल्पांद्वारे आम्ही मानवी स्वभावाची ताकद दर्शवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, भावनिक खोली कथा सांगण्याचे ठरवले आहे. द सिग्नेचरची गोष्ट अतिशय सुंदर असून त्यात असामान्य कलाकार काम करत आहेत. अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराचा हा 525 वा सिनेमा आहे. हा सिनेमा आमच्या प्लॅटफॉर्मवर सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या निमित्ताने आमची कंटेंट लायब्ररी आणखी समृद्ध होईल तसेच उच्च दर्जाचे मनोरंजन अर्थपूर्ण आणि प्रभावी कथाकथनाद्वारे सादर करण्याची आमची बांधिलकी आणखी दृढ होईल.’ असे त्यांनी सांगितले.
निर्माते आणि प्रमुख अभिनेते अनुपम खेर या चित्रपटाबाबत म्हणाले, ‘अनुपम खेर स्टुडिओने व्यक्तीरेखांवर आधारित सिनेमे दर्जेदार कथाकथन आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवासह सादर करण्याचे आणि त्याद्वारे जगभरातील प्रेक्षकांना आपलेसे करण्याचे ध्येय ठेवले आहे. द सिग्नेचर सिनेमात एक मध्यमवर्गीय माणूस साकारला आहे. सारांश सिनेमा असो, खोसला का घोसला असो, संसार असो किंवा सलाखे, मी कायमच प्रत्येक भूमिकेला काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा- धनुषच्या ‘इडली कढई’च्या कलाकारांमध्ये शालिनी पांडेची एंट्री, अभिनेत्रीचे हैदराबादमध्ये शूटिंग सुरु!
या सिनेमातील माझ्या व्यक्तीरेखेचे वेगळेपण म्हणजे तो आपल्या पत्नीवर समर्पित वृत्तीने प्रेम करतो. इतक्या वर्षांत त्यांचे नाते जोडीदाराच्या पलीकडे गेले आहे. ते एकमेकांचे मित्र झाले आहेत. हेच या व्यक्तीरेखेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ही कथा सर्वांना आपलीशी वाटेल, कारण त्यामध्ये असंख्य लोकांना आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल. मी सामान्य माणसाच्या आयुष्यावर आधारित दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधील असून हा सिनेमा त्याला अपवाद नाही. ही भावस्पर्शी आणि आपलीशी वाटणारी कथा जगभरातील प्रेक्षकांना ZEE5 च्या माध्यमातून पाहाता येईल. मला आशा आहे, की या सिनेमाला सर्व प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळेल.’ असे अभिनेत्याने सांगितले