 
        
        मोबाईल क्रांतीचा फटका! छत्रपती संभाजीनगरमधील सिनेमागृहे ओस! (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर: मोबाईल क्रांती आणि फोर जी नेटवर्कमुळे चित्रपटगृहे हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. कोट्यवधींचा खर्च करून उभी केलेली ही थिएटर प्रेक्षकांअभावी ओस पडू लागली होती. विजेचा खर्चही निघत नसल्याने शहरातील चार सिनेमागृहे पूर्णपणे बंद पडली, तर जी सुरु आहेत ती देखील शेवटचा श्वास घेत होती. अशा परिस्थितीत, सिनेमागृहांना ‘संजीवनी’ देणारा एक महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) नुकताच गृह विभागाने जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार, सिनेमागृहांसमोरील जागेत आता रुग्णालये किंवा शाळा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या काळात मोहन, रॉक्सी, गुलजार, स्टेट, सादिया अशी काही मोजकीच सिनेमागृहे होती. काळानुसार चित्रपटगृहांचे रूपडे पालटणे गरजेचे झाले आणि एकाच थिएटरमध्ये अनेक स्क्रीन असलेली ‘मल्टिप्लेक्स’ संस्कृती पुढे आली. तरुणाईला हवी असणारी आसनव्यवस्था आणि साऊंड सिस्टीम मिळाल्याने सुरुवातीला सिनेमाचे शो हाऊसफुल्ल जात होते.
मात्र, इंटरनेट जगतात क्रांती झाल्याने आणि मोबाईलवर मनोरंजन सहज उपलब्ध झाल्याने चित्रपटगृहांमधील गर्दी हळूहळू कमी झाली. अंबा, अप्सरा, अंजली, संगीता, नुपुर, अनुपमा, पीव्हीआर अशा मल्टिप्लेक्स रुपातील चित्रपटगृहांनी देखील प्रेक्षकांअभावी बंद करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती.
शहरात आजरोजी एकूण १४ चित्रपटगृहे होती. यापैकी रॉक्सी, स्टेट, मोहन आणि गुलजार ही पूर्णपणे बंद झालेली आहेत. तर सादिया चित्रपटगृहाला ‘भूतबंगल्याचे’ स्वरूप आले होते. नव्याने तयार झालेली अंबा, अप्सरा, अंजली, संगिता, नुपुर आणि अनुपमा ही देखील सध्या अडचणीत आहेत. सादिया टॉकीजचे मालक सईद बाब आणि शिवनाथ राठी यांनी या समस्येवर शासन दरबारी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता.
नवीन शासन निर्णयामुळे थिएटर मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सादिया थिएटरचे मालक सईद बाबा यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. “शासनाने उशिरा निर्णय घेतला असला तरी, तो आमच्यासाठी संजीवनी दिल्यासारखा आहे. या निर्णयामुळे मनोरंजनाबरोबरच रुग्णसेवा आणि शिक्षणातून समाजसेवा करण्याचे चांगले काम आमच्या हातून होईल.” या निर्णयामुळे बंद पडलेल्या किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या सिनेमागृहांच्या जागेचा सदुपयोग होणार असून, थिएटर मालकांना उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.






