 
        
        शहरात नव्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर शहराची वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी जलवाहिनीतून येत्या १५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरपासून या नव्या जलवाहिनीतून शहराला २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एमजेपी आणि कंत्राटदार कंपनी जी.व्ही.पी.आर. यांनी जलद गतीने काम हाती घेतले आहे. जायकवाडी येथील जॅकवेलचा शेवटचा स्लॅब पूर्ण झाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत या स्लॅबवर मोटारी बसविण्याचे काम पूर्ण होईल, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची पूर्व चाचणी होणार आहे.
शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी पूर्वीची ५६ एमएलडी क्षमतेची योजना पुनरुज्जीवित करून ७५ एमएलडी क्षमतेची नवीन योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २६ एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यातच डिसेंबरपर्यंत शहराला २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची आणि मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार एमजेपीने मागील दोन महिन्यांत जलवाहिनी आणि जॅकवेलच्या कामाला गती दिली आहे. जायकवाडी धरण परिसरातील २७ मीटर खोलीच्या जॅकवेलच्या शेवटच्या स्लॅबवर प्रत्येकी १५ टन वजनाच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. या मोटरद्वारे ३७०० एचपी क्षमतेच्या दोन पंपांच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जाईल.
नोव्हेंबरमध्ये मोटर बसवणे
मोटार बसविण्याचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर पाण्याच्या चाचणीस सुरुवात होईल. नक्षत्रवाडी ते जायकवाडीदरम्यान टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीची जोडणीही अंतिम टप्प्यात आहे. एकूण १२ गॅपपैकी २ गॅप नुकतेच जोडले गेले असून, आता केवळ १० गॅप शिल्लक आहेत. यापैकी एक गॅप जोडण्यासाठी १०० मि.मी. व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवर ‘शटडाऊन’ घ्यावे लागणार आहे. हे काम पुढील काही दिवसांत पूर्ण होईल. एमजेपीने जॅकवेल परिसरात मनुष्यबळ वाढवले असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणीपूर्व तयारी पूर्ण करून १५ डिसेंबरपासून नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची चाचणी सुरू करण्याचे नियोजन आहे.






