एक महत्त्वाचा विचार विनोद आणि उपहासाच्या माध्यमातून देणाऱ्या ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) या चित्रपटाची कथा मन गुंतवून टाकणारी आहे. ‘झी सिनेमा’वर (Zee Cinema) जनहित में जारी’ या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर (Janhit Mein Jaari World Television Premier) आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटात मध्य प्रदेशच्या एका छोट्या गावातील तरुणीच्या जीवनाचे चित्रण केले आहे. ही तरुणी एक आव्हानात्मक नोकरी स्वीकारते, पण या कामावर आपले कुटुंबीय आणि संपूर्ण गावाकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमुळे ती चकित होते.
‘ड्रीम गर्ल’ हा विनोदी चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्यांनीच हा महिलाकेंद्रित आणि काहीसा वेगळ्या विषयावरील हा चित्रपट बनविला आहे. यात गुणी अभिनेत्री नुसरत भरुचाने मनोकामना या नायिकेची भूमिका साकारली आहे. तिला विजयराज, अनूद सिंह ढाका, ब्रिजेंद्र काला आणि परितोष त्रिपाठी या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकांनी साथ दिली आहे. जय बसन्तूसिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात मनोकामनाच्या जीवनातील अनेक घटना या दैनंदिन विनोदनिर्मितीतून घडताना दिसतात.
या चित्रपटाबद्दल नुसरत भरुचा म्हणाली, “मी अशा एका कुटुंबात वाढले आहे ज्यात आम्ही सर्व गोष्टींबाबत पारदर्शकता पाळायचो आणि ज्यात कोणत्याच गोष्टींवर बंदी नव्हती. त्यामुळे मी जेव्हा ‘जनहित में जारी’ची पटकथा वाचली, मला त्याबद्दल खूपच उत्सुकता वाटली. या चित्रपटाचं सार हे बरंचसं पीएसएसारखं असलं, तरी त्याचं जे सादरीकरण केलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना संकोच न वाटता त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचतो. विजयराज यांच्याबरोबर काम करण्याचा माझा हा अनुभव अगदी नवा होता. त्यांची व्यक्तिरेखा माझ्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट आहे. खरं म्हणजे ‘जनहित में जारी’सारख्या चित्रपटाच्या कथेला विशिष्ट प्रमाणात प्रामाणिकता, वैचारिकता आणि सहानुभूतीची गरज आहे. या सर्व गोष्टी चित्रपटात आणण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केला आहे. झी सिनेमाच्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल, अशी मी आशा करते.”
या चित्रपटात विनोद, प्रेम आणि जनजागृती यांचा मिलाफ झाला असून ‘जनहित में जारी’ हा एक सामाजिक आशय असलेला चित्रपट आहे. यात मनोकामना ही तरुणी एका छोट्या गावात काहीशी वेगळी नोकरी स्वीकारते. पण गावकऱ्यांच्या मते अशा छोट्या गावात हे काम करणे स्त्रीला शोभादायक नाही. यावेळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे मनोकामना आपली नोकरी अधिकच जबाबदीरीने स्वीकारते आणि आपल्या कामात ती मनाने गुंतून जाते. पारंपरिक विचारसणीत बुडालेल्या आपल्या कुटुंबियांना ती पुन्हा आपलेसे करू शकेल का? त्यांना आपल्या मागे उभी करू शकेल का? की तिला एकटीलाच ही वाट चालावी लागेल?
हे जाणून घेण्यासाठी झी सिनेमावर येत्या २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वाजता ‘जनहित में जारी’ चित्रपट बघावा लागेल.