फोटो सौजन्य: कृष्णराज महाडिक कार्यालय इन्स्टाग्राम अकाऊंट
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर नको त्या चर्चा सुरु झाल्या. ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापूरात गेली होती. तिने कोल्हापूरला गेल्यानंतर कृष्णराज यांच्यासोबत करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दोघांचेही एकत्र फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये सध्या सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा सुरु होत आहे. आता या सर्व प्रकरणावर कृष्णराज महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाडिक कुटुंबीयांची अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘सून होणार की नाही?’ प्रकरणावर कृष्णराज यांनी आता स्वत: पडदा टाकला आहे. त्यांनी ‘राजश्री मराठी’ला स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णराज महाडिक हे भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत. रिंकूसोबतच्या नात्याबद्दल बोलताना कृष्णराज म्हणाले, “फोटोमुळे गैरसमज करू नका. रिंकू माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. एका कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरला आल्या होत्या. त्या निमित्ताने माझी आणि रिंकूची भेट झाली. म्हणून आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे एकत्र फोटो काढला जो फोटो माझ्या सोशल मीडिया टीमने पोस्ट केला. त्यावरून खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या दोघांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल विचारलं जात आहे. पण तसं काहीच नाही. त्यामुळे कृपया गैरसमज करू नका. आम्ही ठरवूनच भेटलो होतो. पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय. आम्ही फक्त चांगले फ्रेण्ड्स आहोत. त्यापलीकडे आमच्यात काहीच नाही.”
कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांचा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रिंकू राजगुरू महाडिकांची तिसरी सून होणार अशा चर्चा सुरू झाल्या. “महाडीकांची तिसरी सुन”, “कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील आमदार”, “जोडी खूप छान दिसते”, “हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा”, “महाडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं”, “मला वाटलं ठरलं की काय”, “विचार करायला हरकत नाही” या आणि अशा अनेक कमेंट्सने लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर रिंकू आणि कृष्णराज ट्रेंडिंगमध्ये होते. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी (१० फेब्रुवारी) कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू महोत्सवा’साठी गेली होती. त्याचवेळी कृष्णराज आणि रिंकू यांनी एकत्र कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले.