फोटो सौजन्य - Social Media
सध्या भारतात सैय्यारा सिनेमाने साऱ्यांचे लक्ष जरी वेधून घेतले असले तरी ‘महावतार नरसिम्हा’च्या एंट्रीने तरुणांचे लक्ष वळले आहे. ‘महावतार नरसिम्हा’या सिनेमाने चांगलीच कामगिरी केली आहे. या चित्रपटाला इतके पाहिले जाते आहे की सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. ‘महावतार नरसिम्हा’ आता फक्त ऍनिमेटेड फिल्म राहिलेली नसून ती बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार करणारी देशातील पहिली ऍनिमेटेड फिल्म आहे. ‘महावतार नरसिम्हा’ने देशातील साऱ्या एनिमेटेड फिल्म्सला मागे सोडले आहे.
चित्रपट सिनेमागृहात येताच त्याने ‘सैय्यारा’ चित्रपटाला टक्कर देण्यास सुरुवात केली होती. ‘महावतार नरसिम्हा’सोबत या शर्यतीत ‘सैय्यारा’, ‘धडक २’ तसेच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटांची लढत पाहायला मिळत आहे. नुकतेच, ‘सैय्यारा’ सिनेमाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.
‘महावतार नरसिम्हा’चे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन!
‘महावतार नरसिम्हा’ने १२ दिवसांत १०६ कोटींचा आकडा पार केला आहे. विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून, मंगळवारी साडे सात कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. चित्रपटाने अनेक हिट आंतरराष्ट्रीय ऍनिमेटेड फिल्मने भारतात केलेले रेकॉर्डही तोडले आहे. फिल्म ‘स्पायडर मॅन’ने भारतात ४३.९९ कोटींचा व्यवसाय केला होता. तर एनिमेटेड फिल्म ‘कुंग फु पांडा’ने भारतात ३० ते ३२ कोटींचा व्यवसाय केला होता. या सर्व हिट ऍनिमेटेड सिनेमांना मागे टाकत ‘महावतार नरसिम्हा’ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
भगवान विष्णूंच्या दशावतारावर अनेक चित्रपट येणे बाकी
‘महावतार नरसिम्हा’ या ऍनिमेटेड चित्रपटानंतर भगवान विष्णूंच्या सर्व दहा अवतरांसबंधित चित्रपट येत्या दहा वर्षात रसिकांना भेट म्हणून प्रदर्शित केले जाणार आहेत. या चित्रपटांचे दिग्दर्शन दिग्दर्शक अश्विन कुमार करणार असून, निर्माते शिल्पा धवन, कुषल देसाई आणि चैतन्य देसाई आहेत. तसेच या चित्रपटांचे लेखन जयपूर्णा दास आणि रुद्र प्रताप घोष करणार आहेत.