‘मंजुम्मेल बॉईज’ फेम अभिनेत्याला अटक, नेमकं काय आहे प्रकरण
मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गणपती याला ‘मंजुम्मेल बॉईज’ या दाक्षिणात्य चित्रपटातून विशेष प्रसिद्धी मिळाली. सध्या अभिनेता त्याच्या एका कृत्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत वेगवान गाडी चालवल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याला शनिवारी रात्री अंगलामळीहून कलमस्सेरीकडे जात असताना पोलिसांनी पकडले आहे.
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अभिनेता गणपती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेत्याला पोलिसांनी एर्नाकुलम येथील कलमास्सेरी येथे अटक केली आहे. रविवारी पोलिसांनी, गणपतीच्या विरोधात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि सिग्नलचे उल्लंघन करणे या संदर्भात गुन्हा नोंदवला होता. अंगलामळी आणि कलमस्सेरीदरम्यानच्या महामार्गावर गणपती वेगाने गाडी चालवत होता.
LG इलेक्ट्रॉनिक्स अॅंड KCC K-POP स्पर्धा: गायनात अभिप्रिया चक्रबोर्ती आणि नृत्यात दि ट्रेंड विजयी
पोलिसांनी त्याला अठानी आणि आलुवा येथे थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो गाडी चालवत पुढे निघून गेला. शेवटी पोलिसांनी त्याला एर्नाकुलममधल्या कलमस्सेरी येथे त्याला गाठलेच. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर अल्कोहोल टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीने वाहन चालवताना अनेकदा मार्गिका बदलल्या होत्या आणि अत्यंत वेगाने गाडी चालवली होती. अटक झाल्यानंतर काही तासांनीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता गणपती विषयी बोलायचे तर, त्याला विशेष प्रसिद्धी ‘मंजुम्मेल बॉईज’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई केली आहे. चित्रपटाची कथा खूपच रंजक होती आणि प्रेक्षकांनीही त्याचे खूप कौतुक केले. ‘मंजुम्मेल बॉईज’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास, काही तरुण युवक एका ॲडव्हेंचर ट्रीपला जातात. पण त्यांचे ॲडव्हेंचर अचानक धोकादायक वळण घेते. त्यांच्यासोबतच्या एका मुलाने गुना गुफेत उडी मारलेली असते. त्याला वाचवण्यासाठी त्याचे मित्र काय करतात ? त्याला कशे वाचवतात ? हे चित्रपटाचे कथानक आहे.
एकेकाळी बालकलाकार म्हणून मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता गणपती सध्या वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तो अनेक वेब सीरिजचाही भाग झाला आहे. ‘बीफोर द रेन्स’मध्ये बालकलाकार म्हणून गणपतीला ओळख मिळाली. सथ्यान अंथिकाड दिग्दर्शित ‘विनोदयात्रा’चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झाले. त्याने हिंदी चित्रपट ‘द वेटिंग रूम’मध्ये काम करून, हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘मिस्टर अँड मिस’, ‘राउडी अंडर वर्ल्ड’, ‘इन्स्टाग्रामम’, ‘नल्ला निलावुल्ला रथरी’ आणि ‘पद्मिनी’ सारख्या अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये त्याने काम केले आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो ‘ओरू कट्टिल ओरू मुरी’ या चित्रपटात दिसणार आहे.