क्षितीश दातेचा 'मिस्ट्री' वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
राम कपूर आणि मोना सिंग स्टारर ‘मिस्ट्री’ वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये अजूनही जोरदार चर्चा होत आहे. या वेबसीरीजमध्ये या कलाकारांसोबत शिखा तलसानिया आणि क्षितीश दाते हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. ही वेबसीरीज गेल्या काही दिवसांपूर्वीच, ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. सध्या प्रेक्षकांचा या वेबसीरीजला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वेबसीरीजच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता क्षितीश दातेने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्याने त्याच्या वेबसीरीजमध्ये काम करण्याचा त्याचा खासगी अनुभव आणि बॉलिवूडमधील कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अभिनेता क्षितीश दातेने मुलाखती दरम्यान त्याचा बॉलिवूडमधला काम करण्याचा अनुभव शेअर केला, तो म्हणाला की, “मला वाटलं तेवढं शुटिंग दरम्यान माझ्या मनावर दडपण नव्हतं. थोडं नवीन सेटअप असल्यामुळे मनामध्ये भिती होती. कसा तरी घाबरत घाबरत मी सेटवर गेलो आणि पण सर्व कम्फर्टेबल वातावरण असल्यामुळे पहिल्याच दिवशी माझ्या मनावर बिल्कुल दडपण नव्हतं. टीम, कंटेंट आणि एक विशिष्ट मोटिव्ह जर आपल्या डोक्यात सेट असेल ना तर सहजा सहजी आपण कोणत्याही भाषेमध्ये आणि माध्यमामध्ये काम करु शकतो. माझा बॉलिवूड कलाकारांसोबतचा काम करतानाचा अनुभव फार वेगळा आहे. ते कुठेही काम करताना बनचुके सारखं काम करत नाही, तर ते सरावलेले कलाकार आहेत. त्यामुळे काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.”
स्वप्नील जोशी आणि अभिषेक जावकर एकत्र येऊन थ्रिलर चित्रपटाची करणार निर्मिती, लवकरच करणार घोषणा
मुलाखतीदरम्यान क्षितीश दातेने सांगितले की, “माझा राम कपूर आणि मोना सिंग यांच्यासोबत काम करतानाचा एक वेगळेच अनुभव होता. त्यांच्या संपूर्ण अंगातच आणि रक्तातच अभिनय भिनला आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला खरंच खूप मज्जा आली. ही सीरीज क्राईम आणि विनोदी धाटणीची आहे. कोणत्याही प्रकारचा अभिनय असो, राम कपूर अगदी लिलया कोणत्याही प्रकारचा अभिनय करतो. शिवाय, मोना सिंग सुद्धा अगदी लिलया भूमिका साकारते आणि अभिनय करतो. मी सुद्धा तिच्या अभिनयाचा फार मोठा फॅन आहे. अशा भारी माणसांसोबत काम करण्याचा अनुभव फार वेगळा आहे. मग ती इंडस्ट्री कोणतीही असो, मराठी असो किंवा हिंदी… काम करताना इंडस्ट्री महत्वाची नाही. खरंतर, बॉलिवूडमध्ये ओळखीची माणसं फार कमी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत एकाच एनर्जीने काम करणं फार वेगळं आहे.”
“मला राम कपूरसोबत काम करताना एक गोष्ट फार आवडली, ती म्हणजे जर त्याला काम करताना एक गोष्ट जर अडली. तर त्या गोष्टीची तो व्यवस्थित माहिती घेऊनच पुढे जातो. तो स्वत: त्या गोष्टीची माहिती घेईल, त्याबद्दल जाणून घेईल, त्याची सारखी- सारखी तालिम करेल, जो पर्यंत त्याला ती गोष्ट जमत नाही तोपर्यंत तो त्याची प्रॅक्टिस करतोच. तो केव्हाच काम चलाओ सारखं काम करत नाही. त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. पण मला त्याची ही गोष्ट फार आवडली. मी ती गोष्ट नक्कीच अभिनय करताना लक्षात घेईल. इतका मोठा व्यक्ती इतक्या बारकाईने काम करतो, हे पाहून मला फार छान वाटलं. मी त्या प्रमाणेच नक्की काम करण्याचा प्रयत्न करेल.”